जनशक्तीचा दबाव स्पेशल
दिल्ली / प्रतिनिधी- रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात गेले महिनाभर अनेक इच्छुकांची नावे चर्चेत येत होती. या चर्चेला दि. ३० मार्चला पूर्णविराम मिळणार आहे. महायुतीकडून कोकणचे सुपुत्र भाजपचे केंद्रिय सचिव विनोद तावडे उमेदवारी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तावडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कोकणातील महायुतीच्या नेत्यांनी घेतला असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ‘रत्नागिरी – सिंधुदूर्ग’मध्ये सामंत बंधूंना भाजपने धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा या दोन जागा निवडणुकीत शिंदे गटाला देण्यात भाजपच्या वरिष्ठांनी तयारी दाखवली असून त्या बदल्यात रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ भाजप लढविणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत महायुतीच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, भाजपला शतप्रतिशत लोकसभा जिंकायची असून इथे भाजपला पोषक वातावरण आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वेत भाजप इथली सीट निवडून आणू शकतो, यावर शिक्कमोर्तब झाले आहे. त्यामुळे ही सीट भाजपच्या उमेदवाराला मिळावी, असा अट्टाहास होता. परंतु भाजपकडे इच्छुकांची मांदियाळी असल्याने त्यावर सुवर्णमध्य म्हणून विनोद तावडे यांचे नाव फिक्स करण्यात आले असल्याचे सांगितले. शिवाय त्याला महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. कोकणातून नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, प्रमोद जठार, बाळासाहेब माने, उल्का विश्वासराव, दीपक केसरकर, शेखर निकम याचा या नावाला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. सामंत यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सामंत यांना धक्का देत भाजपने विनोद तावडे यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दि. ३० मार्चला जाहीर होणार आहे.