‘साई’कृपेनं गुजरात विजयी! घरच्या मैदानावर पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभव, मागील पराभवाची गुजरातकडून व्याजासह परतफेड..

Spread the love

कमी धावसंख्येच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव केलाय. शेवटच्या षटकांमध्ये राहुल तेवतियाच्या खेळीनं गुजरातला विजय मिळवता आला. तत्पूर्वी गोलंदाजीत गुजरातच्या साई किशोरनं 4 बळी घेत पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.

चंदीगड : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) नं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात चौथा विजय नोंदवलाय. मुल्लानपूर स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात गुजरातनं पंजाब किंग्जचा (PBKS) 3 गडी राखून पराभव केलाय. हा सामना जिंकून गुजरात संघानं गुणतालिकेत मोठी झेप घेतलीय. हा संघ आता 8 व्या स्थानावरुन 6 व्या स्थानावर गेला आहे. गुजरातचे आता 8 गुण झाले आहेत. दुसरीकडं पंजाब संघाचा 8 सामन्यांतील हा सहावा पराभव आहे. हा संघ आता गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर कायम आहे.

🔹️गुजरातची सांघिक कामगिरी….

या सामन्यात पंजाब किंग्जनं प्रथम फलंदाजी करताना गुजरातला 143 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्याच्या प्रत्युत्तरात गुजरात संघानं 7 गडी गमावून 146 धावा करुन सामना जिंकला. गुजरातकडून राहुल तेवतियानं नाबाद 36, शुभमन गिलनं 35 आणि साई सुदर्शननं 31 धावा केल्या. तर पंजाब संघाकडून हर्षल पटेलनं 3 आणि लियाम लिव्हिंगस्टोननं 2 बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि सॅम कुरन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

🔹️गुजरातनं मागील पराभवाचा घेतला बदला….

या हंगामातील उभय संघांमधील हा दुसरा सामना होता. यापूर्वीचा सामना 4 एप्रिल रोजी अहमदाबाद इथं झाला होता. ज्यात पंजाब संघानं 3 विकेट्सनं विजय मिळवला होता. आता गुजरातनं पंजाबचा 3 विकेटनं पराभव करत त्या सामन्याचा बदला घेतला आहे. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त असल्यानं या सामन्यात खेळला नाही. त्याच्या जागी सॅम कुरननं कर्णधारपद स्वीकारले.

🔹️हरप्रीतनं वाचवली पंजाबची लाज….

या सामन्यात पंजाबचा कर्णधार असलेल्या सॅम कुरननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो चुकीचा ठरला. या सामन्यात पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. प्रभसिमरन सिंगनं 21 चेंडूत 35 आणि सॅम कुरननं 20 धावा केल्या. संघानं 52 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर ठराविक अंतरानं विकेट पडणे सुरु झाले, जे शेवटपर्यंत थांबलं नाही.

🔹️गुजरातवर ‘साई’कृपा…

सतत पडणाऱ्या विकेट्समुळं संपूर्ण संघ दडपणाखाली आला. पण शेवटी 9व्या क्रमांकावर आलेल्या हरप्रीत बरारनं 12 चेंडूत 29 धावा करत संघाची लाज वाचवली. या जोरावर पंजाब किंग्जनं 142 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. गुजरात संघाकडून फिरकीपटू साई किशोरनं 4 बळी घेतले. तर नूर अहमद आणि मोहित शर्मानं 2-2 विकेट घेतल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page