जयपूर- राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली आहे. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली. मिळालेल्या माहितीनुसार एकाच रेल्वे रूळावरून दोन्ही रेल्वे आल्याने ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घसरलेल्या रेल्वेच्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.
हा अपघात एवढा भीषण होता की, साबरमती आग्रा केंट सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरून खाली घसरले. मदार स्टेशनजवळ रात्री 1.10 च्या सुमारास मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. यानंतर ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला मात्र साबरमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली.अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये हजारो प्रवासी प्रवास करत होते. रुळावरून घसरल्यानंतर ट्रेन रुळावरून घसरली त्याचबरोबर विजेच्या खांबालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
या घटनेनंतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अजमेर रेल्वे स्थानकातून रात्री 12:55 च्या सुमारास निघाली आणि काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना जबर धक्का बसला आणि सीटवर झोपलेली मुले, महिला आणि वृद्ध लोक सीटवरून खाली पडले. अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली. अपघाताच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे ट्रॅक व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे. एडीआरएम बलदेव राम यांनी सांगितले की, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.