जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | डिसेंबर १२, २०२३.
विरार (पू.) येथील कोकण नगर रहिवासी संघ संलग्न युवा संघ मनवेल पाडा येथे कोकणातील गुहागर, खेड, दापोली, चिपळूण, संगमेश्वर तसेच रत्नागिरी व इतर जिल्ह्यांतील रहिवाश्यांचे प्रमाण तेथील एकूण लोकसंख्येच्या ९०% आहे. म्हणूनच या ठिकाणाला कोकण नगर असे नाव पडले. याठिकाणी कोकणातील सुमारे ४५० ते ५०० कुटुंबांचे वास्तव्य असून नोकरी व रोजगारासाठी त्यांनी कोकणातून येथे स्थलांतर केले आहे.
भाजपा नेते, ओबीसी मोर्चा रत्नागिरी (उत्तर) चे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जातो. असहाय्य रुग्णाला तो संपूर्ण तंदुरुस्त होईपर्यंत आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी ही टीम सदैव तत्पर असते. या टीमच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य मिळाले असल्याने आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेत असल्याचे कोकण नगरच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
संतोष जैतापकर यांचा प्रवास विरारमध्ये होणार असल्याची बातमी समजताच कोकण नगरच्या प्रतिनिधींनी भेटीचे नियोजन केले. संघातर्फे श्री. जैतापकर यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कोकण नगरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा आग्रह यावेळी व्यक्त करण्यात आला. यावर संतोष जैतापकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण उपस्थित राहू असे आश्वासन दिले. “कोकण नगरमध्ये असलेल्या समस्या, अडीअडचणी आणि आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी केव्हाही संपर्क करा; मी नक्कीच सहकार्य करेन” आश्वासक शब्द दिला.
यावेळी कोकण नगर रहिवाशी संघ संलग्न युवा संघ मनवेलपाडा विरार (पूर्व) चे कार्याध्यक्ष निळकंठ कांगणे (चिपळूण), विभाग प्रमुख निलेश पांदे (दापोली), युवा अध्यक्ष निलेश ठोंबरे (गुहागर), उपाध्यक्ष संदीप साळवी (दापोली), सदस्य उत्तम मांडवकर (गुहागर), राजेश मासेकर (दापोली) यांच्यासह इतर पदाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.