दिवा चौकात संध्याकाळी ७.०० ते रात्री ९.०० या वेळेत वाहतूक पोलिसांची नेमणूक करा; अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीची समस्या सोडवतील ; दिवा मनसेचा वाहतूक विभागाला इशारा
दिवा : प्रतिनिधी दिवा शहरातील येवले अमृततुल्य समोरील चौकात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते, विशेषतः गर्दीच्या वेळेत सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० या काळात तर इथे तासभर वाहनांच्या रांगा लागतात. दिवा स्टेशन कडून शीळ फाटा आणि आगासन कडे जाणारी व येणारी वाहने या चौकात येऊन कोंडीत अडकतात. येथे वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने कोणीही कशाही गाड्या दमटवून संपुर्ण वाहतुकीचा बोजवारा उडवून देतात.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होणार?
त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस उपलब्ध असल्यास दिवा चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीला चाप बसेल असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी दिवसा येऊन वाहनांवर कारवाई करून जातात पण ऐन गर्दीच्या वेळेस वाहतुकीचे नियमन करण्यासाठी किमान रात्री ९.०० वाजेपर्यंत वाहतूक पोलीस दिव्यात असणे गरजेचे आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत ही वाहतूक कोंडी जीवावर देखील बेतू शकते याकडे दिवा मनसेने लक्ष वेधले आहे.
जर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस उपलब्ध होत नसतील तर मनसेचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून दिवा चौकातील वाहतूक कोंडीची नियमन करतील, असा इशारा दिवा मनसेने दिला आहे.
जाहिरात