तर हजारो शेतकरी मंत्रालयाचा
ताबा घेतील : रविकांत तुपकर

Spread the love

बुलढाणा :- ही लढाई केवळ शेतकऱ्यांच्या मागण्यांची लढाई नसून राजवाडा विरुद्ध गावगाडा अशी ही आरपारची लढाई आहे. शेतकऱ्यांसाठी शहीद होण्याचीही माझी तयारी आहे, मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने २७ नोहेंबर पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर २८ नोहेंबरला राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेने आगेकूच करतील व २९ नोहेंबरला मंत्रालयात घुसून मंत्रायालाचा ताबा घेतील, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
एल्गार महामोर्चा नंतर आयोजित भरगच्च सभेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्यातील व बाहेरील नेते उपस्थित होते. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आज २० नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार महामोर्चा काढण्यात आला. या शेतकरी एल्गार मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. सोयाबीन – कापसाला दरवाढ मिळावी तसेच येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन – कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी व शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हा एल्गार महामोर्चा निघाला होता.
या महामोर्चात जिल्हाच्या कानाकोपऱ्यातील गाव-खेड्यांमधून शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण सहभागी झाले होते. तसेच कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ, अमरावती अशा राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच कर्नाटक येथील रयत शेतकरी संघाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. रविकांत तुपकर हे राज्याचे नेतृत्व असून हे आंदोलन राज्यव्यापी ठरणार असून राज्यभरातील शेतकरी आणि कार्यकर्ते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात या लढाईत सहभागी होतील, अशी ग्वाही या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभेत बोलताना दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page