रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! कसोटीत ५०० विकेट्स घेणारा भारताचा दुसरा आणि जगातील नववा गोलंदाज ठरला…

Spread the love

Ravichandran Ashwin 500 Test Wickets Complete : रविचंद्रन अश्विनने कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला आहे. भारतीय ऑफस्पिनरने इंग्लिश फलंदाज जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी प्रकारात ही कामगिरी केली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने जॅक क्रॉलीला बाद करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने कसोटीत ५०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. हा पल्ला गाठणारा तो जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. अनिल कुंबळेच्या नावावर कसोटीत ६१९ विकेट्स आहेत.

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडला पहिला धक्का ८९ धावांवर दिला. अश्विनने जॅक क्रॉलीला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. अश्विनची कसोटीतील ही ५००वी विकेट ठरली. हा आकडा गाठणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. खरे तर विकेट्सच्या बाबतीत अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकलेले नाही. पण सर्वात जलद ५०० विकेट घेणारा भारतीय होण्याच्या बाबतीत अश्विन कुंबळेच्या पुढे गेला आहे. अनिल कुंबळेने आपल्या १०५व्या कसोटीत ५०० बळींचा टप्पा गाठला. अश्विनने आपल्या ९८व्या कसोटीत ही कामगिरी केली. एकूणच, संपूर्ण जगात सर्वात वेगवान ५०० कसोटी बळींचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ८७ कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे.

🔹️अश्विन या महान खेळाडूंच्या यादीत झाला सामील –

त्याचबरोबर अश्विन कसोटीत ५०० बळी घेणारा नववा गोलंदाज ठरला आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरनच्या नावावर ८०० कसोटी बळी आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे. शेन वॉर्नच्या नावावर १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जिमी अँडरसन तर चौथ्या क्रमांकावर भारतीय दिग्गज अनिल कुंबळे आहे. जिमी अँडरसन आणि अनिल कुंबळे यांच्या नावे अनुक्रमे ६९५ आणि ६१९ विकेट्स आहेत.

🔹️कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज –

▪️८०० – मुथय्या मुरलीधरन
▪️७०८ – शेन वॉर्न
▪️६९६ – जेम्स अँडरसन
▪️६१९ – अनिल कुंबळे
▪️६०४ – स्टुअर्ट ब्रॉड
▪️५६३ – ग्लेन मॅकग्रा
▪️५१९ – कोर्टनी वॉल्श
▪️५१७ – नॅथन लायन
▪️५०० – रविचंद्रन अश्विन

🔹️सर्वात जलद ५०० कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज (चेंडूनुसार) –

▪️२५५२८ चेंडू- ग्लेन मॅकग्रा
▪️२५७१४ चेंडू- रविचंद्रन अश्विन
▪️२८१५० चेंडू- जेम्स अँडरसन
▪️२८४३० चेंडू- स्टुअर्ट ब्रॉड
▪️२८८३३ चेंडू- कोर्टनी वॉल्श

🔹️सर्वात कमी कसोटीत ५०० विकेट्स घेणारे गोलंदाज –

▪️८७ कसोटी – मुथय्या मुरलीधरन
▪️९८ कसोटी – रविचंद्रन अश्विन
▪️१०५ कसोटी – अनिल कुंबळे
▪️१०८ कसोटी – शेन वॉर्न
▪️११० कसोटी – ग्लेन मॅकग्रा

🔹️रविचंद्रन अश्विनची कसोटीतील कामगिरी …

अश्विनच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली, तर या गोलंदाजाने ९८ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. रवी अश्विनने कसोटी सामन्यात ५०० विकेट्स घेतल्या आहेत. रवी अश्विनने कसोटी सामन्यात २३.८९ च्या सरासरीने आणि ५१.४५ च्या स्ट्राईक रेटने विकेट्स घेतल्या आहेत. या भारतीय दिग्गज खेळाडूने कसोटी सामन्यात ३४ वेळा एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय त्याने ८ वेळा सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page