रत्नागिरी – सिंधुदुर्ग, रायगड लोकसभा जिंकणार, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या समन्वय समिती बैठकीत संकल्प…

Spread the love

संयुक्त पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी (प्रतिनिधी) : देशात २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्याची जोरदार तयारी भाजप आणि मित्रपक्षांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा जागा जिंकण्याचा चंग बांधण्यात आला असून त्यासाठी रत्नागिरी – सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड या दोन्ही लोकसभा मतदार संघातील खासदार हे महायुतीचे निवडून येतील यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. लोकसभा मिशन ४८ अंतर्गत या दोन्ही मतदार संघात महायुतीचे खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून आणले जातील आणि मोदी साहेबांना पंतप्रधान होण्यासाठी ताकद दिली जाईल, असा निर्णय तीनही पक्षांच्या समन्वय समिती बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री तथा दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वयाची बैठक आज रत्नागिरीत संपन्न झाली. या बैठकीत 3000 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा १४ तारखेला रत्नागिरीत घेण्याचे निश्चित झाले आहे. या मेळाव्याला आता व्यासपीठावर जे पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज ही जी समन्वय समितीची बैठक झाली त्यामध्ये राज्यस्तरावरून तीन प्रमुख समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये आमदार शेखर निकम प्रमोद जठार आणि सदानंद चव्हाण यांचा समावेश आहे. तालुकास्तरावरही या पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी समन्वय समिती नियुक्त केली जाणार आहे. येत्या आठवड्यात त्याबाबत कार्यवाही होईल अशी माहिती उद्योग मंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

या संयुक्त पत्रकार परिषदेच्या वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, भाजपचे नेते समन्वयक प्रमोद जठार, शिवसेना आमदार योगेश कदम, समन्वयक सदानंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादीचे बाबाजी जाधव, शिल्पताई सुर्वे, बिपिन बंदरकर, प्रकाश साळवी, सुदेश मयेकर तसेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी माळ नाका येथील हॉटेल विवेकच्या पाठीमागील सभागृहात झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की ज्याप्रमाणे राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर समन्वय समिती आहे तालुकास्तरावर समन्वय समिती नियुक्त होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटनिहाय तसेच विधानसभा गटनिहाय सुद्धा समन्वय समितीतर्फे मेळावे यापुढे होणार आहेत. *लोकसभा मिशन 48″ अंतर्गत या मेळाव्यांची आता सुरुवात केली जाणार आहे. सर्वजण एक दिलाने काम करतील आणि खासदारकीसाठी जो उमेदवार दिला जाईल त्याचा प्रचार करतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तसेच रत्नागिरी रायगड मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि मोदी साहेबांना पंतप्रधान होण्यासाठी ताकद दिली जाईल, असे सामंत म्हणाले.

22 जानेवारीला आयोजित होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस जाणार नाही असे काँग्रेसने जाहीर केले आहे. याबाबत आपले म्हणणे काय असे विचारले असता पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, की काँग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते आहे. राम मंदिर होऊ नये हाच काँग्रेसचा अजेंडा होता आणि आज राम मंदिराचे उद्घाटन होत असताना उद्घाटनाचे निमंत्रण न स्वीकारणे हा संपूर्ण देशवासीयांचा अपमान आहे, असेही ना. सामंत म्हणाले. त्यामुळे असा मंदिर विरोधी अजेंडा असणाऱ्या लोकांबरोबर आपण हिंदुत्ववादी असल्याचे सांगणारे आता सोबत जाणार का, हे त्यांनी ठरवावे. हिंदुत्वाशी गद्दारी कोणी केली हे जनतेला ठाऊक आहे. राम मंदिर व्हायला हवे आणि 370 कलम हटवले गेले पाहिजे ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्न होती आणि ही स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत आणि अशावेळी काँग्रेसला राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिलेले निमंत्रण त्यांनी फेटाळले आहे आणि याचे उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लोकांनी दिले पाहिजे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल विधानसभेत आमदार पात्रता प्रकरणी जो निर्णय दिला आहे आणि शिवसेना ही खऱ्या अर्थाने शिंदे यांची आहे असाच निर्णय दिला आहे त्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले आहेत याबद्दल विचारता ना. सामंत म्हणाले, या निर्णयाबाबत मी कालच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडलेली आहे. कालचा जो निकाल लागलेला आहे त्याबाबत आम्ही निश्चितपणे समाधानी आहोत. शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे असा जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता त्यावर कालच्या निकालाने शिक्कामोर्तब झाला आहे. शिंदे यांचे सरकार घटनाबाह्य आहे असे म्हणणारे हे कालच्या निर्णयाने घटनाबाह्य ठरले आहेत. दुसरी गोष्ट भरत गोगावले हे शिवसेनेचे प्रतोद आहेत हे कालच्या निर्णयाने सिद्ध झाले आणि 1999 ची शिवसेनेची जी घटना आहे त्यातील उल्लेख मी आता जाहीरपणे या ठिकाणी करत नाही. परंतु 1999 ची शिवसेनेची घटना हीच योग्य घटना आहे असे निवडणूक आयोगाने सांगितले होते आणि कालच्या सुनावणीत, कालच्या निकालात हेच सिद्ध झाले आहे. त्यामुळे आम्ही कालच्या निकालाबाबत समाधानी आहोत, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की कालच्या एका निकालाबाबत मात्र आम्ही साशंक आहोत की एवढे सगळं होऊ नये उद्धव ठाकरे गटाचे तेरा आमदार अपात्र कसे काय झाले नाहीत? त्यामुळे हे तेरा आमदार अपात्र व्हावेत यासाठी आम्ही सर्वांशी चर्चा करून विधी तज्ञांशी चर्चा करून सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार नक्की करू शकतो, असेही पालकमंत्री म्हणाले.

संजय राऊत यांनी काल राहुल नार्वेकर यांना दिलेल्या निकालावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले की काल जो निकाल दिला गेला, तो मॅच फिक्सिंग प्रमाणे होता आणि एका बेईमानानं चोर लफंगे पाकीटमारांच्या निकालाचे वाचन केलेलं आहे, याबाबत आपले नेमके म्हणणे काय आहे, यावर बोलताना नामदार सामंत म्हणाले, की यामध्ये नवीन काहीच नाही. त्यांचे हे नेहमीच शब्द आहेत. तेवढेच शब्द त्यांच्या डिक्शनरीत आहेत आणि त्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. हे महाराष्ट्रातील जनतेलाही आता कळून चुकले आहे. त्यांचे शब्द फार मनावर घेण्याची काही गरज नाही. त्यांनी यापुढेही दररोज साडेनऊ वाजता प्रेस घ्यावी आणि त्यासाठी त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत, असेही उदय सामंत म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page