पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार…

Spread the love

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.12 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी 12.15 च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई येथे दुपारी 4:15 च्या सुमारास, पंतप्रधान एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते विविध विकासकामांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील.

नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून ‘सुलभ गतिशीलतेला’ चालना देणे, पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर 2016 मध्ये झाली होती. अटल सेतू, एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतुक व्यवस्थेत ही सुधारणा होणार आहे. नवी मुंबई येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान 12,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पूर्व मुक्त मार्गाचे ( ईस्टर्न फ्री वे )ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह ला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची पंतप्रधान यावेळी पायाभरणी करणार आहेत. हा 9.2 किमी लांबीचा बोगदा 8700 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधला जाईल. हा बोगदा मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे ऑरेंज गेट आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल. सूर्या या मोठ्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.1975 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून सुमारे 14 लाख लोकसंख्येला यामुळे पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे.

याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान सुमारे 2000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामध्ये ‘उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा’ समावेश आहे ज्यामुळे नवी मुंबईशी स्थानिक संपर्क अधिक वाढेल; कारण नेरुळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान असलेल्या उपनगरीय रेल्वेसेवा आता उरणपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून त्याचेही उदघाटन पंतप्रधान करतील. याशिवाय इतर रेल्वे प्रकल्प जे राष्ट्राला समर्पित केले जाणार आहेत, त्यामध्ये ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक ‘दिघा गाव’ तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वेप्रवास सुलभ होणार आहे. पंतप्रधान विशेष आर्थिक क्षेत्र-मेटलसांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया विभाग -(SEEPZ SEZ) येथे असलेल्या, 3D प्रिंटिंग मशिनसह जगातील सर्वोत्तम उपलब्ध मशिन्ससह भारतात सुरू झालेल्या पहिल्या रत्ने आणि आभूषणे क्षेत्राच्या ‘भारतरत्न’ या विशाल सर्वसाधारण सुविधा केंद्राचे (मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर) उदघाटन करतील. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे विशाल केंद्र (CFC) रत्न आणि दागिन्यांच्या व्यापारात निर्यात क्षेत्राचा कायापालट करेल आणि देशांतर्गत उत्पादनालाही मदत करेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page