
कणकवली | एप्रिल १२, २०२४- लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या सर्व क्षमतांनीशी ‘लोकसभा निवडणूक २०२४’च्या मैदानात उतरले आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत कमळ फुलवायचे असून मागील २ वर्षे मा. आमदार, लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार यांच्या नेतृत्त्वात याची पूर्वतयारी सुरु आहे.
▪️आता निवडणुकीची उत्कंठा शिगेला लागली असून श्री. प्रमोद जठार राजापूर विधानसभेतील प्रत्येक पंचायत समिती गणात महायुतीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणार आहेत. यासाठी ३०० ते ४०० कार्यकर्त्यांच्या छोटेखानी बैठका घेऊन पक्षाची भूमिका, अंत्योदयाची संकल्पना, राष्ट्रीय सुरक्षा, कृषी, महिला आणि युवा कल्याण तसेच आत्तापर्यंत कोकणाची झालेली उपेक्षा आणि त्यावर समाधान देणारा महायुतीचा खासदार याबाबत कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणार आहेत.
▪️दि. १२ एप्रिल रोजी राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात ६ मॅरेथॉन बैठका ते घेणार असून दि. १३ एप्रिल रोजी ७ बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लांजा-साखरपा भागात दि. १४ व १५ एप्रिल रोजी बैठका होणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यात राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव, महिला मोर्चा लोकसभा संयोजिका सौ. शिल्पा मराठे, सामाजिक कार्यकर्ते राजनभाई देसाई, जिल्हा उपाध्यक्ष महेश (मुन्ना) खामकर, जिल्हा सरचिटणीस रवि नागरेकर, अमित केतकर आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या दौऱ्यानंतर राजापूर विधानसभेतील वातावरण ढवळून निघेल आणि महायुतीच्या उमेदवाराला कमळ चिन्हावर भक्कम मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.