रत्नागिरी : राज्यातील हाय व्होल्टेज निवडणुकींपैकी एक असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत ४७ हजार मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना ४ लाख ४८ हजार ५१४ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार, विद्यमान खासदार विनायक भाऊराव राऊत (शिवसेना ठाकरे गट) यांना पराभूत केले. त्यांना ४ लाख ६५६ मते मिळाली. तब्बल ४० वर्षांनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ चिन्हावर उमेदवार निवडून आला आहे.
टपाली मतदान आणि सुरुवातीच्या तीन फेऱ्यांमध्ये राणे आणि राऊत एकमेकांना धोबपछाड देत होते; मात्र चौथ्या फेरीत राणे यांनी १ हजार ७२४ मतांची आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकून राहिली. २५ व्या फेरीअखेर राणेंनी एकूण ४, ४८ हजार ५१४ मते घेतली, तर खासदार राऊत यांना ४ लाख ६५६ मते पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत राणे ४८ हजार ८१५ चे मताधिक्य घेत निवडून आले. राणे मिळत असलेले मताधिक्य पाहून सौ. नीलम राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हे मतमोजणीच्या ठिकाणी आले. राणेंचा विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत, तसेच ढोल ताशांच्या गजरात आपला आनंद साजरा केला. नीतेश आणि नीलेश राणे बंधूंनी गाडीच्या टपावर चढत उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात सामील होऊन नारायण राणे यांचा विजय साजरा केला.
अपक्ष उमेदवार विनायक लवू राऊत यांना तिसऱ्या क्रमांकाची १५,८२६ मते मिळाली. ११ हजार ६४३ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. वंचितचे मारुती जोशी यांना १० हजार ०३९, बसपाचे राजेंद्र आयरे यांना ७ हजार ८५६ मते, अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना ६ हजार ३९५ मते, तर अमृत तांबडे यांना ५ हजार ५८२ मते मिळाली. बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार यांना ५ हजार २८० मते आणि सैनिक समाज पार्टीचे सुरेश शिंदे यांना २ हजार २४७ मते पडली. विजयी उमेदवार खासदार नारायण राणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रमाणपत्र दिले.