राजापूर अर्बन बँकेची एक हजार कोटींच्या एकत्रित व्यवसायाकडे वाटचाल…

Spread the love

या आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसाय पोहचला ७७२ कोटींवर

सन २०२३-२४  या आर्थिक  वर्षात ५ कोटी ८८ लाखाचा ढोबळ नफा

आधुनिक सेवेचे पुढेचे पाऊल: ग्राहकांना मिळणार व्हरच्युअल बँकिंग सेवा

*बँकेच्या अध्यक्षा  सौ. अनामिका जाधव व सीईओ शेखरकुमार अहिरे यांची माहिती

राजापूर (प्रतिनिधी): आपल्या असंख्य ग्राहकांना दर्जेदार आणि आधुनिक सेवा देणाऱ्या राजापूर अर्बन को. आपॅ. बँकेने आपली यशस्वी घौडदौड कायम राखली आहे. सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटीच्या एकत्रित व्यवसायाचे उद्दिष्टय गाठण्याचा व शेडयुल बँकेत रूपांतराचा निर्धार करणाऱ्या बँकेने सन २०२३-२४  या आर्थिक वर्षात एकत्रित एकूण व्यवसाय ७७२ कोटींवर नेत या आर्थिक वर्षात 5 कोटी ८८ लाख इतका ढोबळ नफा मिळविला आहे. तर बँकेने आधुनिक सेवा सुविधांमध्ये पुढचे पाऊल टाकत आपल्या ग्राहकांना आता घर बसल्या बँकिंग फिल यावा यासाठी व्हरच्युअल बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव व मुख्यकार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

राजापूर अर्बन बँकेच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील प्रगतीबाबत माहिती देण्यासाठी बँकेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. व अहिरे यांनी या आर्थिक वर्षतील बँकेने केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.

पुढील आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित व्यवसाय एक हजार कोटींवर नेताना बँकेचे शेडयुल बँकेत रूपांतर करण्याचा निर्धार बँकेने केलेला आहे.  त्या दृष्टीने बँकेची वाटचाल सुरू असल्याचे नमुद करत पुढील आर्थिक वर्षात हे उद्दिष्टय साध्य होणार असल्याचे सौ. जाधव यांनी नमुद केले. बँकेने गतवर्षी सुरू केलेल्या युपीआय पेमेंट सुविधेला ग्राहकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून आता घराघरात आणि कानाकोपऱ्यातल्या छोटया व्यावसायिकांपर्यंत राजापूर अर्बन बँक पोहचली असल्याचे सौ. जाधव व अहिरे यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात बँकेने  तळेरे,  शृंगारतळी व  मालवण या तीन नवीन शाखा सुरू केल्या असून आता एकूण बँकेच्या १३ शाखा झाल्या आहेत. भविष्यात आणखी दोन नवीन शाखा प्रस्तावित असल्याचेही या द्वयींनी नमुद केले.

बँकेने या आर्थिक वर्षात भागभांडवलात रु. १ कोटी ७६ लाखाची वाढ करुन ते आता रु.११ कोटी २३ लाख इतके केले आहे. बँकेच्या कायम सभासदांमध्ये १,८८९ इतक्या सभासदांची वाढ होऊन सभासद संख्या २९,४६४ इतकी झाली आहे. बँकेच्या ठेवीमध्ये रु.६५ कोटी ९४ लाख इतकी वाढ होऊन एकूण ठेवी रक्कम रु.४७३ कोटी ५० लाख इतक्या झाल्या आहेत. तर कर्जामध्ये रु.४८ कोटी ६३ लाख वाढ होऊन एकूण कर्ज रक्कम रु. २९८ कोटी १९ लाख इतके झाले आहे. त्यामुळे बँकेचा एकूण व्यवसाय हा ७७१ कोटी ७० लाख इतका करण्यात बँकेला यश प्राप्त झाले आहे. राखीव निधीमध्ये रु.१ कोटी ३२ लाखाची वाढ होऊन ते रक्कम रु. २५ कोटी १७ लाख इतका राखीव निधी झालेला आहे. बँकेने आर्थिक वर्षात सुमारे रु.१० कोटींची गुंतवणूकीत वाढ करुन वर्ष अखेर सुमारे रक्कम रु. १६७ कोटी इतकी गुंतवणूक केलेली आहे.

बँकेचा गतवर्षीचा ढोबळ एन.पी.ए. हा १.३१% इतका होता तो १.२३% इतका राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. गेले १४ वर्षे सातत्याने ०.००% एन.पी.ए. बँकेने राखला आहे. बँकेचे रिझर्व्ह बँक व शासनाच्या निकषानुसार कर्जाचे ठेवीशी प्रमाण (सी.डी. रेशो) ६२.९८% पर्यंत ठेवण्यात यश आले असून यामध्ये १.७४% इतकी वाढ दिसून येत आहे. बँकेने आर्थिक वर्षात ढोबळ नफा रु.५ कोटी ८८ लाख इतका मिळवीला आहे.

ठेवीदारांचे संरक्षणाकरीता बँकेने डिपॉझिट इन्शुअरंन्स अॅण्ड क्रेडीट गॅरंटी कार्पोरेशन (DICGC) कडे ठेवीदानांना रक्कम रु.५ लाखांपर्यंत विमा संरक्षण प्राप्त करण्याकरीता ठेव विम्याचे हप्ते नियमितपणे भरत आहे. या आर्थिक वर्षात नाटे, तरळे, शृंगारतळी व मालवण या चार शाखांनी शून्य टक्के एनपीएचे प्रमाण राखले आहे. बँकेच्या एटीएमसेवेला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून टेक्नीकल ट्रानजेक्शन डिक्लाईन रेशो केवळ अर्धा टक्का आहे. तो देखील इंटरनेट सुविधेत जर का कधी व्यत्यय आला तर होत असल्यचाचे अहिरे यांनी नमुद केले.

भविष्यात बँकेची सेवा अधिक  जलद व आधुनिक करताना ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करताना बँकेत जाऊन आपण सेवा घेत आहोत याचा आनंद घेता यावा यासाठी व्हरच्युअल बँकिंग सेवा सुरू करण्याचा बँकेचा मानस असल्याचे सौ. जाधव व अहिरे यांनी सांगितले. यासाठीच्या आवश्यक त्या सेवा ग्राहकांना बँक मोफत पुरविणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार व बँकेचे हितचिंतक यांचा विश्वास व भक्कम पाठबळ, सर्व संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे परिश्रम यावरच बँकेची ही यशस्वी घौडदौड सुरू असल्याचे सौ. जाधव व अहिरे यांनी नमुद केले.

यावेळी बँकेच्या सुरू असलेल्या आधुनिक सेवा सुविधा व भविष्यातील नवीन आधुनिक सेवा सुविधांबाबत बँकेचे आयटी अधिकारी प्रसन्न खांबे यांनी माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विवेक गादीकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर,  संचालक संजय ओगले, राजेंद्र कुशे, किशोर जाधव, प्रकाश कातकर सौ.  प्रतिभा रेडीज, बँकेचे अधिकारी प्रसन्न मालपेकर, रमेश काळे, राजापूर शाखाधिकारी रोहित सामंत आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक प्रसन्न मालपेकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष विवेक गादीकर यांनी मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page