काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; जातनिहाय जनगणना, 50 टक्क्यांवर आरक्षण वाढीसाठी करणार घटनादुरुस्ती…

Spread the love

लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसनं जातनिहाय जनगणना आणि 50 च्या वर आरक्षण वाढ देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षानं आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात काँग्रेसनं सामाजिक आर्थिक परिस्थितीची गणना करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यासह एससी, एसटी आणि ओबीसीमधील नागरिकांना समान न्याय देण्यासाठी 50 टक्के आरक्षणावरील मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करेल, असंही आश्वासन आपल्या जाहिरनाम्यात काँग्रेसनं दिलं आहे.

आरक्षणावरील मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती….

राज्यात ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली. मात्र आरक्षण वाढवण्यावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं ओबीसी, मराठा आणि धनगर आरक्षणाचं भिजत घोंगडं पडलं आहे. त्यासाठी काँग्रेसनं 50 टक्के आरक्षणावरील मर्यादा वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती करणार, असं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे.

काँग्रेस देणार 30 लाख नोकऱ्या…

काँग्रेसनं आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं दिली आहेत. यात देशात वाढलेल्या बेरोजगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काँग्रेस देशात 30 लाख नोकऱ्या देईल, असं त्यांनी जाहीरनाम्यात आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण काँग्रेसकडं वळतील असा पक्षाचा व्होरा आहे. यासह काँग्रेसनं युवा स्टार्टअप फंड, बेरोजगार भत्त्यासारख्या योजनेत थेट खात्यात पैसे जमा करणं, शैक्षणिक कर्जात सवलत आदी योजना आणण्याचं आश्वासन दिलं आहे.

🔹️काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे…

▪️जातनिहाय जनगणना करणार
आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी करणार घटनादुरुस्ती

▪️काँग्रेस देणार 30 लाख बेरोजगारांना नोकऱ्या

▪️शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात सवलत

▪️युवा स्टार्टअप फंडसाठी भरघोस निधी

▪️अग्निवीर योजना बंद करुन जुनी भरतीपद्धत करणार सुरू

▪️शेतकऱ्यांना कर्जमाफीऐवजी थेट एमएसपी देणार

▪️गॅस सिलिंडर देणार 450 रुपयात
पेट्रोल आणि डिझेलचे दर करणार कमी

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page