अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आज राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १० जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
पुणे /प्रतिनिधी- राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. गेल्या आठवड्यात नागरिकांनी कडक्याची थंडी अनुभवली. मात्र, आता ही थंडी गायब झाली आहे. राज्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून १० जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. बहुतांश जिल्ह्यात आज ढगाळ हवामान राहणार आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार असून राज्याच्या इतर भागात तापमान वाढले आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही दिवसांनपासून ढगाळ व दमट हवामान आहे. यामुळे थंडी गायब झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवत आहेत. त्यामुळे अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आज राज्यात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी याच परिणाम राज्यावर दिसत असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस होणार आहे.
या जिल्ह्यांना बसणार तडाखा…
राज्यात आज गुरुवारी (दि ५) कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधूदुर्ग जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अहिल्यानगर, धाराशिव व लातूर जिल्ह्यात मुसळधार तर बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातून थंडी गायब…
राज्यातून थंडी गायब झाली आहे. राज्यात सध्या उष्ण व कोरडे हवामान असून काही ठिकाणी ढगाळ हवामान असल्याने पिकांवर याचा परिणाम होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा वाढला आहे. बदललेल्या या वातावरणाचा प्रतिकूल परिमाण पिकांवर होणार असून उत्पन्न घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.