मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंडणगड पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महिला विकास कक्ष, विशाखा समिती, इतिहास विभाग, प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोलीस वर्धापन दिन’ व ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ निमित्त “स्त्री सुरक्षा”व” रायफल्स माहिती ” विषयक कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडणगड पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर नितीन गवारे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मीक परहर उपस्थित होते.
डॉ. ज्योती पेठकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर पोलीस अंमलदार श्री दत्तात्रय पिसाळ यांनी SL सेल्फ लोडेड रायफल 7.62 व AK 56 ,5.56 या दोन रायफल्सची सविस्तर माहिती व कार्यपद्धती सांगितली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना पोलीस इन्स्पेक्टर नितीन गवारे यांनी सांगितले की विद्यार्थिनींना स्व- सरंक्षणाची आवश्यकता आहे.
विद्यार्थीनींनी आपले स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण स्वतः समर्थ व सक्षम बनले पाहिजे. आज मुली शिक्षण व नोकरीसाठी बाहेर पडत असतात. बाहेर पडल्यानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. त्याकरिता काळाची गरज म्हणून मुलींनी स्व-संरक्षणाचे धडे घेणे आवश्यक आहे. मुलींनी स्वसंरक्षणाची माहिती करुन घेतल्यास त्या स्वतःचे संरक्षण स्वतः करु शकतील. पुरुषांनी स्त्री ला समानतेचा दर्जा देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी स्त्री-पुरुष समानता निकोप समाजासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मंडणगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुहास मांडवकर, पोलीस अंमलदार अक्षय कुंभार व महेंद्र तांदळे, महिला पोलीस सौ. वैशाली चव्हाण, महिला विकास कक्ष व विशाखा समिती सदस्य डॉ. संगीता घाडगे या सर्वांचे सहकार्य लाभले.