*अहिल्यानगर-* अहिल्यानगरमध्ये ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पार पडला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याचा अंतिम सामन्यात अत्यंत थरारक पद्धतीने पराभव केला. या चुरशीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ याने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा अतिशय रंगतदार ठरला. दोन्ही पैलवान ताकदवान असल्याने हा सामना जास्त रंगात आला. अखेर पृथ्वीराजने योग्य संधी साधत पहिला गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रने एक गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली. पण त्यानंतर पृथ्वीराजने महेंद्रला चितपट करत असताना त्याला थेट रिंगणाच्या बाहेर ढकललं. यामध्ये पृथ्वीराजला आणखी एक गुण मिळाला. अखेर वेळ संपल्याने पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरला. यानंतर त्याच्या समर्थकांनी मैदानात जोरदार जल्लोषाला सुरुवात केली. अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली.
अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी यात नोंदणी केली होती. आज या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला, ज्यामध्ये सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये मानाची गदा उंचावण्यासाठी लढत झाली. या सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडला धुळ चारत नवा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला. तत्पुर्वी, या स्पर्धेत माती विभागात महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव असा सामना पार पडला तर गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे असा चुरशीचा सामना झाला. यामध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाडने साकेत यादवचा पराभव केला तर शिवराज राक्षेचा पृथ्वीराज मोहोळने पराभव केला. पुण्याचा मल्ल असलेल्या पृथ्वीराज मोहोळने मानाची चांदीची गदा उंचावली असून आलिशान थार गाडीही त्याला मिळणार आहे.