पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्‍या टप्प्याचं उद्घाटन …

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. ही मेट्रोलाईन पूर्णपणे भूमिगत आहे.

मुंबई : बहुप्रतिक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन 3, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. पंतप्रधान ठाणे इथं विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. 14,120 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहनिर्माण, शहरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.

मुंबई आणि ठाण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार मोठी भेट

ठाणे इथल्या नियोजित कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी मेट्रो स्टेशनवर लाइन 3 च्या उद्घाटन समारंभासाठी दाखल होणार आहेत. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी बीकेसी ते सांताक्रूझ मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोनं प्रवास देखील करणार आहेत. त्याच मेट्रोनं ते बीकेसी मेट्रो स्थानकात परत येणार आहेत. प्रवासादरम्यान मेट्रो मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे लाभार्थी आणि विद्यार्थी, मजूर यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.

मोबाइल अ‍ॅप’चं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रो कनेक्ट3 या मेट्रो सेवा ‘मोबाइल अ‍ॅप’चं लोकार्पण करणार आहेत. हे अ‍ॅप नवीन वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी तयार केलेले आहे. तसेच मेट्रो 3 प्रकल्पावर आधारित ‘कॉफी टेबल बुक’चं अनावरणही त्यांच्या हस्ते केलं जाईल. यामध्ये भूमिगत मेट्रो प्रवासाच्या नेत्रदीपक फोटोंचा संग्रह असणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या की, “मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो लाईन 3 चं उद्घाटन होतंय, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मुंबईकरांना जलद, सुखद प्रवास अनुभवता येणार आहे. मला विश्वास आहे की, मेट्रो 3 प्रकल्प मुंबईसाठी मैलाचा दगड ठरणार असून ही मेट्रो मुंबईकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही.”

मेट्रो ड्रायव्हरलेस

मेट्रो तीन भुयारी मार्गिकेतील 12.5 किमीचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. यावर 10 स्थानकांचा समावेश असून त्यातील 9 स्थानकं भूमिगत राहणार आहेत, तर आरे स्थानकात एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारलं आहे. बीकेसी ते आरे दरम्यानचा प्रवास 6.5 मिनिटांचा असणार आहे. प्रत्येक फेरीत 2500 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. पहिल्या टप्प्यात 9 गाड्याच्या माध्यमातून मेट्रो सेवा सुरू होईल. सदर मेट्रोचं वैशिष्ट्य म्हणजेच मेट्रो ड्रायव्हरलेस राहणार आहे. साडे सहा मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. मेट्रो 3 च्या दिवसाला 12.5 किमी मार्गांवर मेट्रोच्या 96 फेऱ्या होणार आहेत. मेट्रो ताशी 85 किमी वेगानं धावणार आहे. आरे ते बीकेसी प्रवासासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. या मार्गेकेवरील कमीत कमी भाडं 10 रुपये असणार आहे. कुलाबा सीप्झ आरे कॉलनीपर्यंत मार्गिका सुरु झाल्यानंतर प्रवास भाडं 70 रुपयेपर्यंत असणार आहे. आरे ते बीकेसी मेट्रो सेवा सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा वाजेदरम्यान सुरू राहणार आहे. रविवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत सेवा असणार आहे. मार्च 2025 पर्यंत सदर मार्गेकेवरील सेवा पूर्ण सुरू होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page