नवरात्र-विशेष लेख!.. तिसरा दिवस!-विद्युत सहाय्यक पदावर काम करतात रूपाली बाचीम!…

Spread the love

नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी नेतृत्वान, कर्तुत्ववान, गुणांकडे झेप घेणाऱ्या……….. महिलां!

विद्युत सहाय्यक पदावर काम करतात रूपाली बाचीम!

आजच्या आधुनिक भारताच्या जडणघडणीत ज्या स्त्रिया आपले मौलिक योगदान देत आहेत. आपल्या आशा, आकांक्षाची, व कामगिरीची शक्य तितकी अलीकडच्या तरुण पिढी पुढे मांडावी व त्यांच्या कार्याचे मोल तरुण पिढीच्या मनावर बिंबवावे, अशा हेतूने अगदी खेडेगावात जन्मलेल्या रूपाली बाचीमने प्रेरणेने घेतली भरारी!

       
संगमेश्वर तालुक्यातील अगदी टोकाला असलेले खेडेगाव करजुवे बाचीम वाडीत रूपाली शांताराम बाचीम  यांचा जन्म१९९८ साली झाला. एकदम गरीब कुटुंबात जन्म होऊन शेती काम करीत असलेले वडील शांताराम बाचीम यांचे गेल्या काही वर्षांपूर्वी अल्पशा आधाराने निधन झाले. वडिलांचे छत्र हरवल्यावर सुद्धा तीन बहिणी व एक भाऊ यांचा आईने सांभाळ करत त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सद्धया आई सुद्धा शेती काम करते. दोन बहिणींचा विवाह होऊन दिल्या घरी गेल्या. स्वतः रूपाली व भाऊ आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अजून हायस्कूल येथे शिक्षण घेत चांगले गुण मिळवले. पुढे काय करावे हे धुसर असल्याने वडिलांचे मामेभाऊ मंगेश कांगणे  व  नातेवाईक  दर्शन बुदर यांनी  आयटीआय इलेक्ट्रिशन करावे असा सल्ला दिला.

       
आयटीआय मध्ये प्रवेश घेऊन इलेक्ट्रिशियन करून पुढे काय करायचे? शिवाय या बाजूला एक मुलगी म्हणून आवड ही नव्हती. तरीसुद्धा मोठ्या नातेवाईकांचा आदर ठेवून संगमेश्वर येथील आयटीआय कॉलेजमध्ये प्रवेश इलेक्ट्रिशन साठी घेतला. तेथील वर्गात फक्त चार जणीच  मुली व बाकी सर्व मुलगे होते. रोज संगमेश्वर ते करजुवे असा प्रवास करून  दोन वर्षे शिक्षण घेतले .या कालावधीमध्ये तेथील मार्गदर्शक सरांचे उत्तम मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. इलेक्ट्रिशनच्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. इलेक्ट्रिशन मध्ये ७१ %  गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर आरवली येथे कंत्राटी कामगार म्हणून एक वर्ष काम केले. त्यानंतर कामाची मुदत संपल्यावर काहीतरी करावे म्हणून मुंबईला जाऊन काम मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी भाऊ सुद्धा आयटीआय मध्ये प्रवेश घेऊन प्लंबिंग चे शिक्षण घेत होता. याच दरम्यान विद्युत सहाय्यक पदाच्या ऑनलाइन जागा भरती होणार हे कळले, म्हणून विद्युत सहाय्यक पदासाठी ऑनलाइन अर्ज केला. व काही दिवसांनी त्या अर्जांनुसार विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाली व निवड झाल्यावर आरवली महावितरण कार्यालयात नोव्हेंबर २०२१ मध्ये विद्युत सहाय्यक पदावर हजर झाल्या.

           
गेली तीन वर्षे या कार्यालयांतर्गत धामापूर तर्फे संगमेश्वर या गावासाठी विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. विद्युत सहाय्यक म्हणजे गावात वायरमन  म्हणून संबोधले जाते. गावातील वायरमन ही व्यक्ती आत्तापर्यंत पुरुष मंडळीच करतात हे एवढेच येथील लोकांना ज्ञात होते .प्रत्यक्ष फिल्डवर काम काय? कसे करावे ? हे तेथील अधिकारी अमोल म्हस्के व लाईनमन संदेश पारधी यांनी पूर्णपणे काम समजावून सांगितले .प्रत्येक वेळी सहकार्य पण करत आहेत.

           
त्यामुळे साइडवर ड्युटीसाठी गेल्यावर मीटर बसवणे, बिलांची वसुली करणे, लाईन वरील फॉल्ट शोधणे ,व काढणे, सिंगल कंप्लेंट दूर करणे ,फ्युजचे काम करणे,शिडीने चढून पोल वरील सुद्धा कामे करणे, फॉल्ट काढणे ,अशी कामे अंगवळणी पडल्याने आता अगदी स्त्री म्हणून सुद्धा सहजपणे ही काम करत असतात.जरी हे काम अगोदर आवडत नसले, पण आता हे काम करण्याचा पूर्ण आत्मविश्वास  वाढल्याने प्रत्यक्ष काम करताना आनंद व समाधान मिळते. कारण प्रसंगी सेवाभाव म्हणून ग्राहकांच्या गरजेला भाऊ महेंद्र याच्या  सोबतीने  कधीही काम करण्याची तयारी ठेवतात. ग्राहक लोकांची कामे प्रामाणिक व वक्तशीरपणे करण्यात येतात. त्यामुळे ग्राहकांचे सहकार्य चांगले मिळते. व कर्तव्यावर आत्मविश्वास ठेवला तर आपण आयुष्यात पुरुषांबरोबर अशी कामे मी करू शकतो,व यशस्वी होऊ शकतो, अशा प्रकारचा आत्मविश्वास स्त्री म्हणून नक्कीच वाढतो.आपल्या स्वतःच्या पायावर स्त्री उभी राहून स्वावलंबी होता येते, असा अनुभव आल्यामुळे माझ्यासारख्या अनेक मैत्रिणींनी व  महिलांनी कोणत्याही अवघड क्षेत्रात सुद्धा आत्मविश्वासाने धाडसी व निश्चयी निर्णयाने स्त्री  यशस्वी होऊ शकते, व करिअर संपन्न करू शकते .म्हणून अशा क्षेत्रात महिलांनी उतरायला कोणती हरकत नाही. माझ्या आयटीआय क्लास मध्ये चौघी मुलींपैकी मी या क्षेत्रात येऊन बाकीच्या तिघी क्षेत्र सोडून इतरत्रं कामे करत आहेत.

   
दिवसभराचे साईड वरील काम करून घरी गेल्यावर आईला घरच्या कामात, शेतीच्या कामात ,मदत करतात. त्यामुळे आई सुद्धा खूप समाधानी आहे. रूपाली बाचीम यांची ही प्रेरणा व आदर्श अनेक मुलींनी घेतला तर अनेक मुली  नेतृत्वान, कर्तुत्ववान नक्कीच होतील  यातय शंका नाही.

*▪️लेख शब्दांकन………*
*▪️श्रीकृष्ण खातू धामणी /संगमेश्वर-मोबा.नं.८४१२००८९०९*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page