पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
*नवी दिल्ली :* आज देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन मोठा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलं आहे. “देश या गौरवशाली क्षणाची वाट पाहत होता. आजचा दिवस देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या बारतमातेच्या वीर सुपुत्रांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. हा देश भारत मातेच्या या वीर सुपुत्रांच्या कायम ऋणात राहील” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. स्वातंत्र्या दिन 2024 च्या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर सकाळीच लाल किल्ल्यावर दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीताराम आदींसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं सलग 11 वेळा ध्वजारोहण….*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आहे. त्यामुळे हा 11 वेळा सलग लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. आजच्या या सोहळ्याला 6 हजार विशेष पाहुणे उपस्थित आहेत.
*‘वन नेशन, वन इलेक्शन’वर केलं भाष्य….*
पंतप्रधान मोदी यांनी देशात सातत्याने सुरु असलेल्या निवडणुकांबाबत भाष्य करताना म्हटले की, “देशात कोणतीही योजना राबवायला गेले की त्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो. निवडणूक आली म्हणून योजना आली, असे बोलले जाते. एकूणच सगळ्या गोष्टींचा संबंध निवडणुकीशी जोडला जातो. यादृष्टीने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या धोरणाबाबत व्यापक चर्चा झाली आहे. राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले आहेत. आता संपूर्ण देशाने वन नेशन, वन इलेक्शनसाठी पुढे आले पाहिजे. त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे.”
*राजघाटावर केलं महात्मा गांधींना वंदन…*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळ असलेल्या राझघाटवर भेट दिली. राजघाटावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना वंदन केलं. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.