रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बोरथडे येथील शेतकरी कुटुंबातील प्रतिक राणे या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवलं आहे. मेहनत आणि जिद्द ठेवल्यास प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येतं, याचाच आदर्श त्याने घालून दिला आहे. प्रतिकच्या या यशानंतर गावातील त्याचे मित्र आणि ग्रामस्थांनीही प्रतीकचं कौतुक करत गावातून त्याची गुलाल उधळत, थाटात वाजत-गाजत मिरवणूक काढत त्याचं स्वागत, अभिनंदन केलं आहे.
जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नाला मेहनतीची जोड दिल्यास यश दूर नाही. मेहनतीने यशालाही सहज गवसणी घालता येते याचाच आदर्श या ग्रामीण भागातील असलेल्या प्रतिक राणे या तरुणाने घालून दिला आहे. प्रतिक राणेचं प्राथमिक शिक्षण लांजा तालुक्यातील बोरथडे जिल्हा परिषद शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण वाटूळ येथे झालं. तर महाविद्यालयीन शिक्षण लांजातील श्रीराम वंजारे महाविद्यालयात झालं आहे. प्रतिक हा सामान्य कुटुंबातील असून आई-वडील गावातच शेती करतात. प्रतिकने मिळवलेलं हे मोठं यश आई-वडिलांसाठीही अभिमानास्पद ठरलं आहे. प्रतिकचं महाविद्यालयातील शिक्षण हे लांज्यातील महाविद्यालयात झालं. तो २०१६-१७ या बॅचमधील केमिस्ट्री विभागात बीएससीचा विद्यार्थी होता. बीएससी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रतिकने विविध स्पर्धा-परीक्षा देण्याची तयारी सुरू केली होती.
यासाठी प्रतिकला राजापुरातील संकेत गुरसाळे या मित्राचं मार्गदर्शन लाभलं. संकेत गुरसाळे हा मंत्रालयामध्ये कार्यरत आहे. त्यानंतर प्रतिकने पुणे इथे स्पर्धा-परीक्षेचा अभ्यास करत तयारी केली. या मोठ्या स्पर्धा परीक्षेत प्रतिकला यश मिळालं आहे. आई-वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेलं स्वप्न आपण आज पूर्ण करू शकलो, याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया प्रतिकने दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल लागला आणि उत्तीर्ण झाल्याची बातमी समजताच राणे कुटुंब आणि प्रतिकच्या मित्रमंडळी, ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या मित्रमंडळींनी प्रतिकला उचलून घेत, तोंडभरून कौतुक करत पेढे वाटत, वाजत-गाजत, गुलाल उधळत त्याची गावातून मिरवणूक काढली. प्रयत्न आणि मेहनत केल्यास यशाला सहज गवसणी घालता येते, याचाच आदर्श प्रतिक राणेने घालून दिला आहे. लांजा तालुक्यातील बोरथडे गावच्या प्रतिकने स्पर्धा परीक्षेत मोठं यश मिळवत ग्रामीण भागातही कोणत्याही सोयी-सुविधा नसताना स्पर्धा परीक्षा क्रॅक करणं, हे आव्हान प्रतिकने लीलया पेललं आहे. कोकणातील या शेतकरी सुपुत्राने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.