सिंधुदुर्ग- मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. राजकोट येथे पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना चौकशीबाबत नोटीस पाठवली आहे.
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आमच्याकडून चौकशी सुरू आहे. पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तुमच्याकडे पुरावे असल्याचे पत्रकार परिषदेत म्हणाला होतात. त्यामुळे तुमच्याकडे असलेले पुरावे आम्हाला देऊन चौकशीसाठी सहकार्य करावे.
वैभव नाईक काय म्हणाले ?…
आम्ही पुतळा कामातील भ्रष्टाचार समोर आणत असल्याने पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली आहे. पुतळ्याचे काम चांगले न केल्याचे समितीच्या अहवालात सांगण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारण्यात आला तर त्याचे बिल का देण्यात आले? असा सवालही नाईक यांनी विचारलं आहे. सादर केलेला अहवाल खरा असेल तर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नीलेश राणेंची नाईकांवर टीका…
वैभव नाईक यांना चौकशीसाठी बोलवल्यामुळे नीलेश रांने यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पुतळ्याची वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा प्रश्न राहतोच. असे काय झाले की, वैभव नाईक यांच्यावर संशय घ्यावा लागला. या प्रकरणी वैभव नाईक यांचे नाव येणे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, असे नीलेश राणे म्हणाले.
समितीने अहवालात काय सांगितले?…
दरम्यान मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गंज, कमकुवत फ्रेम व चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळला, असा ठपका चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. या अहवालामुळे छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणात चौकशी समितीने 16 पानांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. पुतळ्यातील गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंग कामामुळे हा पुतळा कोसळल्याचे, या अहवालात म्हटले आहे. पुतळा उभारलेले फ्रेमवर्क तितके मजबूत नव्हते. तसेच देखभाल योग्य पद्धतीने झाली नसल्याने पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता, असेही या अहवालात म्हटले आहे.