चंद्रपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. चिमुरच्या सभेला उपस्थित असणाऱ्या मतदारांच्या संख्येवरून या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे बहुमताचे सरकार अस्तित्वात येईल. त्यानंतर केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकासही दुप्पट वेगाने होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी चंद्रपूरच्या चिमुर विधानसभा मतदारसंघात सभा झाली. या सभेत त्यांनी महायुतीच्या संकल्पपत्राचे कौतुक करत हे संकल्पपत्र महाराष्ट्राच्या पुढील 5 वर्षांच्या विकासाची गॅरंटी असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीचे संकल्पपत्र महाराष्ट्राच्या 5 वर्षांच्या विकासाची गॅरंटी…
नरेंद्र मोदी म्हणाले, महायुतीच्या संकल्पपत्रात लाडकी बहीण, शेतकरी, तरुण व महाराष्ट्राच्या विकासासाठी एकाहून एक सरस संकल्प करण्यात आलेत. एआय यूनिव्हर्सिटी असेल, वॉटर ग्रिड प्रकल्प असेल, प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणारी योजना असेल, पक्के घर असो किंवा डिजिटल कनेक्टिव्हिटी जाळे पसरवणे असो या सर्वांचा यात समावेश आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला या संकल्पपत्रासाठी शुभेच्छा देतो. हे संकल्पपत्र पुढील 5 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी बनेल.
महायुतीसोबत केंद्रात एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार येईल. म्हणजे विकासाचा वेगही दुप्पट वेगाने होईल. महाराष्ट्राच्या लोकांनी मागील अडीच वर्षांत विकासाचा हा दुप्पट वेग पाहिला आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे विकासाच्या अनेक योजना होत आहेत. आज राज्यात जवळपास 1 डझन वंदे भारत रेल्वे धावत आहेत. राज्यातील 100 हून रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. एवढेच नाही तर अनेक रेल्वेमार्गांचा विस्तारही होत आहे.
महायुतीचे सरकार किती वेगाने काम करते हे जनता पाहत आहे. पण ही महाविकास आघाडीची जमात या वेगाला कशी खिळ घालते हे चंद्रपूरच्या जनतेला चांगलेच ठावूक आहे. येथील जनता अनेक दशकांपासून रेल्वेची मागणी करत होते. पण काँग्रेस आघाडीने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आमच्या सरकारने येथील विविध रेल्वे मार्गांना मंजुरी दिली. याचा येथील जनतेला मोठा फायदा होईल. त्यांचा वेळ व पैसे वाचतील, असे मोदी म्हणाले.
वेगवान विकास मविआच्या हाताबाहेरची गोष्ट…
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा वेगवान विकास ही महाविकास आघाडीच्या हाताबाहेरची गोष्ट आहे. आघाडीने केवळ विकासाला ब्रेक लावण्याची पीएचडी केली आहे. कामांना अडवून ठेवण्यात काँग्रेसने डबल पीएचडी केली आहे. त्यांनी आपल्या अडीच वर्षांच्या काळात मेट्रोपासून वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गाला रोखण्याचे काम केले. त्यामुळे आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू हे लक्षात घ्यावे. त्यामुळे पुन्हा त्यांना लुटीचा परवाना मिळवू देऊ नका.
कलम 370 वरूनही साधला निशाणा…
काँग्रेस व तिचे मित्र पक्ष हिंसाचार व फुटिरतावादाच्या बळावर आपला राजकीय स्वार्थ साधतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जम्मू काश्मीरच्या विधानसभेत काय झाले ते अवघ्या जगाने पाहिले. जम्मू काश्मीरने अनेक वर्षांपर्यंत फुटिरतावाद व दहशतवाद सोसला. तिथे महाराष्ट्रातील अनेक जवान धारातिर्थी पडले. ही स्थिती का निर्माण झाली? हे पाप कसे वाढले? ज्या कलमाच्या आधारावर हे सर्व झाले ते कलम 370 आम्ही रद्दबातल केले. पण खोऱ्यातील आताच्या सरकारने हे कलम पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला, असे मोदी म्हणाले.
चंद्रपूरनेही नक्षलवादाची आग सोसली आहे. या क्षेत्राने काय पाहिले नाही. नक्षलवादामुळे येथील अनेक तरुणांचे जीवन उद्धवस्त झाले. हिंसाचाराचा खुनी खेळ सुरू राहिला. यामुळे औद्योगिक शक्यता धुसर झाली. काँग्रेस व तिच्या मित्रपक्षांनी केवळ खुनी खेळ दिले. पण आमच्या सरकारने नक्षलवादाला अंकुश लावला. यामुळे आज हे संपूर्ण क्षेत्र मोकळा श्वास घेत आहे. आज चिमुर व गडचिरोलीत नव्या संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रात नक्षलवाद पुन्हा वरचढ ठरू नये यासाठी तुम्हाला काँग्रेस व तिच्या मित्रांना येथे फटकू द्यायचे नाही, असे मोदी मतदारांना आवाहन करताना म्हणाले.
एकट्या चिमुरमध्ये 16 लाख कुटुंबांना मोफत रेशन…
मला गरीबांच्या जिवनात येणाऱ्या अडी-अडचणींची जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी मी करतो. आमच्या नेतृत्वात कोट्यवधी लोकांना पीएम आवास मिळाले, कोट्यवधी लोकांना मोफत उपचारांची गॅरंटी मिळाली, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर 70 वर्षांवरील सर्वच वृद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला. आम्ही गावोगावी रस्ते व वीज पुरवठा पोहोचवा. कोट्यवधी कुटुंबांना पाण्याचे कनेक्शन दिले. एकट्या चिमुरमध्येच 16 लाख कुटुंबांना मोफत रेशन मिळत आहे. गरीब कल्याण योजनांचा सर्वाधिक लाभ आमच्या वंचित समाजाला झाला. यामुळे 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेखालून वर आले, असे मोदी म्हणाले.
काँग्रेसने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काँग्रेस सरकारने मोठे नुकसान केले. त्यांनी आपल्या राजवटीत जलयुक्त शिवार योजनेला ब्रेक लावला होता. महायुतीने सरकारने ही योजना पुन्हा सुरू केले. गत काही वर्षांत सिंचनाच्या अनेक योजना पूर्णत्वास गेल्या. आमच्या सरकारने अनेक जुन्या कायद्यांत बदलून बांबूची शेती करणे सुलभ केले. आपल्या देशात आदिवासींची लोकसंख्या 10 टक्क्यांच्या आसपास आहे. काँग्रेस आदिवासी समाजाला जातीत विभागून त्यांना कमकूवत करण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींनी स्वतःची अनुसूचित जमातीची ओळख पुसण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस आदिवासींची एकता फोडण्याचा प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान मोदींनी यावेळी एक हैं तो सेफ हैंचा नाराही दिला. ते म्हणाले, आपण एक राहिलो तरच सुरक्षित राहू. वेगळे झालो तर काँग्रेस तुमचे आरक्षण हिरावून घेईल. काँग्रेसच्या शाही कुटुंबाची नेहमीच ही मानसिकता राहिली आहे. या देशावर राज्य करण्यास आपला जन्म झाल्याचे त्यांना वाटते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर केव्हाच दलित, मागासवर्ग व आदिवासींना पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे काँग्रेसला आरक्षणाची चिढ आहे. 80 च्या दशकात राजीव गांधी सरकारने दलित व आदिवासींना मिळणाऱ्या विशेष अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.