
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेतील पथकाला हवाई मार्गाने संवेदनशील भागात पाठवण्यात आले आहे.
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात…
रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या राज्यात दोन टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. त्यानुसार, आज (दि.13) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी आज आणि दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला 38 जागांसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रासह झारखंड निवडणुकीचाही निकाल लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात 683 उमेदवार निवडणुकच्या रिंगणात आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अनेक नेतेमंडळी निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. झारखंडमधील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. त्यानुसार, आता मतदान घेतले जात आहे. राज्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे. मात्र, 950 बूथ आहेत जिथे मतदानाची वेळ फक्त 4 वाजेपर्यंत असेल.
पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी 15344 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत मतदान व्हावे यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या 200 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 683 उमेदवार रिंगणात असतील.
73 महिला उमेदवारांचाही समावेश…
यामध्ये 73 महिला उमेदवारांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या 43 जागांपैकी 17 सर्वसाधारण, तर 20 जागा अनुसूचित जमातीसाठी आणि 6 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
पहिल्या टप्प्यासाठी मतदानाची तयारी पूर्ण..
13 नोव्हेंबर रोजी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेतील पथकाला हवाई मार्गाने संवेदनशील भागात पाठवण्यात आले आहे. राज्यात सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.
मॉडेल बूथही कार्यान्वित…
राज्यात ठिकठिकाणी अनेक मॉडेल बूथ बांधण्यात आले आहेत, जिथे मतदारांना सर्व सुविधा उपलब्ध असतील. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले जात आहे. या बूथवर झारखंडच्या कला आणि हस्तकलेची झलकही पाहायला मिळेल.
पहिल्या टप्प्यात 43 जागांवर होतंय मतदान…
कोडरमा, बरकाथा, बार्ही, बरकागाव, हजारीबाग, सिमरिया, चतरा, बहरगोरा, घाटशिला, पोटका, जुगसलाई, जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, इचगढ, सरायकेला, चाईबासा, माझगाव, जगन्नाथपूर, मनोहरपूर, चक्रधरपूर, खरसंपवा, खरसांग, ता. रांची, हटिया, कानके, मंदार, सिसाई, गुमला, विशुनपूर, सिमडेगा, कोलेबीरा, लोहरदगा, मनिका, लातेहार, पंकी, डाल्टनगंज, विश्रामपूर, छतरपूर, हुसेनाबाद, गढवा, भवनाथपूर यांसह इतर मतदारसंघात मतदान घेतले जाणार आहे.