मुख्यमंत्र्यांवरील व्यक्तिगत टीका कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांना भोवली? मोरे पाहुणे म्हणून आले आणि वतनदार बनले…

Spread the love

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एक ग्रामीण, नागरीकरण झालेलामिश्रित मतदारसंघ.

कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एक ग्रामीण, नागरीकरण झालेलामिश्रित मतदारसंघ. हा मतदारसंघ आगरी बहुल समाजाचा असला तरी पक्षीयदृष्ट्या तो कोणाचाही बालेकिल्ला नाही. धनशक्ती, आश्वासने, आमिषे दाखवली की त्याप्रमाणे या मतदारसंघ झुकतो. आपल्या मतदारसंघाचा आमदार निश्चित करतो. यावेळी नशीब घेऊन आलेल्या, कल्याण ग्रामीणमध्ये नवख्या असलेल्या डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सर्वांचेच आखाडे चुकवून या मतदारसंघात खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने ६६ हजार ३९६ मतांची आघाडी घेतली. प्रस्थापित मनसेचे आ. राजू पाटील यांच्यासह ठाकरे गटाचे माजी आ. सुभाष भोईर यांना धक्का दिला.

सुभाष भोईर, राजू पाटील कल्याण ग्रामीणमधील स्थानिक भूमिपुत्र. मागील वीस वर्षाच्या कालावधीत आलटूपालटून सुभाष भोईर, रमेश रतन पाटील, राजू रतन पाटील या मंडळींनीच कल्याण ग्रामीणचे नेतृत्व केले आणि स्थानिक रहिवाशांनी आपल्या स्थानिक भागाची वतनदारी आपल्याच माणसाच्या हातात राहील याची काळजी घेतली. डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी शहरी भागातून येऊन कल्याण ग्रामीणमध्ये आमदार म्हणून आपले नशीब आजमावण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. त्यांना कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी बाहेरचा उमेदवार म्हणून कधीही आपलेसे करण्याचा प्रयत्न केला नाही.



त्याचीच पुनरावृत्ती यंदा होते की काय अशी चिन्हे असताना, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, शासन गुप्त यंत्रणांसह, मतकल आखणीकारांचे अंदाज चुकवून एक लाख ४१ हजार १६४ मते कल्याण ग्रामीणमध्ये घेतली.

व्यक्तिगत टिकेचा फटका कल्याण लोकसभा…

निवडणुकीच्यावेळी महायुतीला मनसेचे समर्थन होते. लोकसभा निवडणूक काळात आ. पाटील यांनी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी जीवतोड मेहनत घेतली होती. या बदल्यात खा. शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमधील अनेक विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आ. पाटील यांना दिले होते. निवडणुकीनंतर खा. शिंदे यांंनी शब्द पाळले नाहीत आणि आपला भ्रमनिरास झाला, असे जाहीर सभांमधून आ. पाटील यांनीच सांगितले. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेचे राजू पाटील यांची कल्याण ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर झाली. भाजपचे रवींद्र चव्हाण, राजू पाटील यांची मैत्री सर्वश्रृत आहे. डोंबिवली विधानसभेत मनसेने उमेदवार न दिल्याने भाजपने ग्रामीणमध्ये आ. पाटील यांना साथ देण्याची सज्जता ठेवली. त्याप्रमाणे महायुती धर्म बाजुला ठेऊन येथे भाजपने निष्ठेने काम केले. शिंदेसेना, भाजप आणि मनसेच्या ताकदीने कल्याण ग्रामीणचा गड आपण पु्न्हा राखू या गणितांवर अवलंबूून असणाऱ्या राजू पाटील यांना शिंदेसेनेने आयत्यावेळी राजेश मोरे यांची कल्याण ग्रामीणमधील उमेदवारी जाहीर करताच, राजू पाटील यांना धक्का बसला. ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांच्या मतांचे विभाजन होण्याची गणिते या उमेदवारीने मांडण्यात आली.

मोरे यांना उमेदवारी देऊन शिंदे पिता-पुत्रांंनी उपकाराची फेड अपकाराने केल्याची आ. पाटील यांची भावना झाली. सहजपणे होणाऱ्या निवडणुकीत आव्हान उभे राहिले. या उद्विग्नतेमधून डोंबिवलीतील गांधीनगर येथील जाहीर प्रचार सभेत आ. राजू पाटील यांनी मोरे यांच्या उमेदवारीवर बोलताना, शिंदे पिता-पुत्रांची दानतच खोटी आहे, अशी विखारी टीका केली. व्यक्तिगत टीका झाल्याने शिंदे पिता-पु्त्र दुखावले. विशेषता खा. डाॅ. शिंदे यांना हा शब्द जिव्हारी लागला. त्यांनी मोरे यांची उमेदवारी प्रतिष्ठेची करून राजू पाटील निवडून येतातच कसे ते बघू, असे आव्हान स्वीकारून मतदानाच्या पाच दिवस अगोदर कल्याण ग्रामीण मतदारसंघात तळ ठोकला. अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. जोडतोड, फोडाफोडी, नाराजांना एक तंबूत आणले. या सर्व दाणादाणीत ग्रामीणधील पाटील, भोईर यांच्या दुरंगी लढतीचा बेरंग झाला. पाटील, भोईर यांनी विभागवार आपले बांधून ठेवलेले मतदार शिंदेसेनेच्या दाणदाणीमध्ये उधळले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page