देवरुख:- दिनांक ४ मार्च २०२४ ते ७ मार्च २०२४ या कालावधीमध्ये रायगड मधील रोहा तालुक्यातील भुवनेश्वर मैदानामध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या सव्वा लाख चौरस फुटाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या रांगोळीमध्ये संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचे सुपुत्र श्री. सुरज धावडे यांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवला..
सांगली येथील श्री .राजीव पाटिल यांच्या ऑल इज वेल प्रॉडक्शन ग्रुप च्या वतीने सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई व स्थानिक भागातील मिळून किमान ६० ते ७० कलाकारांनी या महारांगोळीसाठी सहभाग नोंदविला… याचे प्रायोजक रायगडचे खासदार श्री. सुनिल तटकरे होते . ही रांगोळी १४ तारखेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खूली असेल.
या संदर्भात चित्रकार श्री. सुरज धावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विश्वविक्रमी महारांगोळी साकारण्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले……
“हे शिवराज्याभिषेक दिनाचं ३५० महोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत अन् या वर्षात प्रत्यक्ष रायगडच्या भूमीत राज्याभिषेकाची विश्वविक्रमी महारांगोळी साकार होत असताना या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग होता आलं ही अभिमानाची गोष्ट होती, अन् त्यामध्ये अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या महारांगोळीतील एक महत्वपूर्ण बाब म्हणजे महाराज व मेघडंबरी हे महत्वपूर्ण भाग रांगोळीमध्ये साकारण्याची संधी ज्या चार चित्रकारांना मिळाली. त्यामध्ये मी एक होतो सोबत इचलकरंजीचे चित्रकार विनायक गायकवाड, सांगलीचे प्रशिद्ध चित्रकार, रंगावलीकार सुरेश छत्रे व शिराळ्याचे चित्रकार राजेंद्र शिंदे होते…”
“एकूणच रंगावलीला सुरवात करत ६० ते ७० कलाकारांनी बऱ्यापैकी २५% काम पूर्ण केले होते. दुपारी कडक उन्हाच्या झळा भयंकर असल्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेवून काम थांबवले होते परंतू निसर्गांने मात्र आपले वेगळे रुप दाखवायला सुरवात केली अन् सोसाट्याचा वारा सुरु झाला अन् पाहता पाहता सर्व रांगोळी मात्र उद्ध्वस्त करुन गेला. निसर्गाची साथ न मिळाल्याने एक नविन संकट समोर उभं राहिल होतं. परंतू ज्या आपल्या महाराजांचा राज्याभिषेक आम्ही साकारत होतो त्यांनी देखिल आपलं स्वराज्य थोडीच सहज उभं केल होत पावलोपावली संघर्ष होताच.. अन् हीच प्रेरणा घेवून पून्हा एकदा आम्ही सर्व कलाकार त्वेशाने उभे ठाकलो अन् ठरवल की आता ही महारांगोळी पूर्ण झाल्याशिवाय विश्रांती नाहीच. जणू काही लढाईच सुरु होती. आमची अन् पाहता पाहता जे महारांगोळी पूर्ण व्हायचं ७२ तासांच उद्दीष्ट आम्ही ठेवलं होतं त्या आधीच अगदी ६० तासांत आम्ही ते लक्ष पूर्ण करु शकलो अन् एकच मोठा विजयी जल्लोष केला. हा विजय आमच्या एकजुटीचा होता, एवढं सलग काम करुन देखील त्या क्षणाला कुणाच्याही चेहऱ्यावर कामाचा क्षीण न दिसता आनंद ओसांडून वाहत होता, प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरुन आला होता”.
“या सर्वांमध्ये महत्वाची भूमिका बजावली ते आमचे कर्णधार म्हणजेच श्री. राजीव पाटिल, चित्रकार श्री. अनिल शिंदे पाटिल, व चित्रकार श्री. प्रदिप पाटिल एकूणच हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा ठरला”.
“पुढील काही दिवसात विविध जागतिक विक्रम या महा रांगोळीच्या नावावर झालेले पहावयांस मिळतील” हे सर्व सांगतांना त्यांचा उर अभिमानानं भरुन आलेला अन् केलेला संघर्ष प्रत्येक क्षणी जाणवत होता..
▪️या कामगिरीबद्दल सर्वच थरातून त्यांच्यावर व सर्व टिम वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…