“धर्मयुद्धात श्रीकृष्ण आमच्या बाजूने”, केजरीवालांनी हरियाणात फोडला प्रचाराचा नारळ..कुरुक्षेत्रमधून उमेदवाराची घोषणा…

Spread the love

कुरुक्षेत्र मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ‘बदलेंगे कुरुक्षेत्र, बदलेंगे हरियाणा. इब्बकै INDIA को जिताना’ असं घोषवाक्य जाहीर केलं आहे.

आम आदमी पार्टीने दिल्लीपाठोपाठ हरियाणातही लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच प्रचारालाही सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीपाठोपाठ हरियाणातही त्यांच्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. केजरीवाल यांनी हरियाणाच्या कुरूक्षेत्र येथून प्रचारमोहीमेला सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टीला इंडिया आघाडीत हरियाणामधील लोकसभेच्या एकूण १० पैकी कुरुक्षेत्र लोकसभेची एक जागा मिळाली आहे. केजरीवाल यांनी या जागेवर आपचे माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार गुप्ता यांना तिकीट दिलं आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी १० मार्च रोजी हरियाणात लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी मंचावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते.

कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघासाठी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ‘बदलेंगे कुरुक्षेत्र, बदलेंगे हरियाणा. इब्बकै INDIA को जिताना’ (कुरुक्षेत्र बदलूया, हरियाणा बदलूया, यावेळी इंडियाला जिंकवूया), असं घोषवाक्य जाहीर केलं आहे. याच घोषवाक्यासह आप कार्यकर्ते कुरुक्षेत्रमध्ये त्यांच्या उमेदवाराचा म्हणजेच सुशीलकुमार गुप्ता यांचा प्रचार करतील.

रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जागेबाबत अनिश्चितता कायम…

आपने कुरुक्षेत्रमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत अरविंद केजरीवाल उपस्थितांना उद्देशून म्हणाले, मतदारांनो यावेळी चूक करू नका, आपल्याला अमूक एका व्यक्तीला पंतप्रधान बनवायचं आहे, तमुक व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवायचं आहे याच्या फंदात तुम्ही पडू नका. तुमच्या खासदारावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुम्ही खासदार निवडा, त्यानंतर ते पंतप्रधान निवडतील. तुम्ही तुमच्या माणसाला संसदेत पाठवा. भाजपाच्या नादाला लागू नका. कारण ते कधीही व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांचा विचार करत नाहीत. आपल्या देशात सध्याच्या घडीला दोन प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे, खरे देशभक्त किंवा अंधभक्त. इथल्या सर्व देशभक्तांनी आमच्याबरोबर यावं आणि अंधभक्तांनी त्यांच्याबरोबर (भाजपा) जावं.

अरविंद केजरीवाल यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, गेल्या १० वर्षांमध्ये खट्टर यांनी हरियाणाची वाट लावली आहे. इथले लहान-थोर खट्टर सरकारला वैतागले आहेत. हरियाणातील जनतेला खट्टर यांचं सरकार पुन्हा नको आहे. कुरुक्षेत्र ही एक ऐतिहासिक भूमी आहे. याच भूमीवर धर्मयुद्ध झालं होतं. आता पुन्हा एकदा धर्म आणि अधर्मामध्ये संघर्ष चालू झाला आहे. त्यावेळी पांडवांकडे भगवान श्रीकृष्ण होते, आज तेच कृष्ण आमच्याबरोबर आहेत. त्यांच्याकडे सर्व प्रकारची ताकद आहे. त्यांच्याकडे सीबीआय, ईडी, आयटीची ताकद आहे. परंतु, आपण अधर्माच्या बाजूने उभं राहायचं की, धर्माच्या? याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page