आठल्ये- सप्रे-पित्रे महाविद्यालयात २५ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन…

Spread the love

फोटो- कार्यशाळेत सहभागी होणारे स्वीडनचे विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक.

देवरुख | फेब्रुवारी २५, २०२३.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा स्व. अ. अ. पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉमर्स कॉलेजच्या ए. के. जोशी ऍक्टिव्हिटी हॉल येथे दुपारी २:३० ते ७:०० यावेळेत संपन्न होणार आहे. महाविद्यालयाचे पर्यावरण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन स्वीडन येथील क्लायमेट अॅक्शन संस्था, सृष्टीज्ञान संस्था, मुंबई व सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख यांच्या सहकार्यातून कार्यशाळेचे आयोजन होत आहे. या कार्यशाळेत भारत व स्वीडनमधील शिक्षण व्यवस्था, पर्यावरण विषयक अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापन याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. कार्यशाळेत स्वीडनमधील रॅडिंग कॉलेज, सॅंडोचे १८विद्यार्थी, ४ शिक्षक व २ अभ्यासक सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये रॅडिंग कॉलेज सॅंडो, स्वीडनचे विद्यार्थी आपत्कालीन प्राथमिक उपचार याबाबत प्रात्यक्षिक दाखवणार असून, महाविद्यालयाचे विद्यार्थी पर्यावरण विषयक प्रकल्पांचे सादरीकरण करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दिली आहे.

परदेशी अभ्यासकांना महाराष्ट्रीयन लोककला, खाद्यसंस्कृती, पेहराव यांचीही ओळख या निमित्ताने करून देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्यावतीने या अगोदरही अमेरिका, स्वीडन येथील संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व परिषदा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.

या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंदजी भागवत व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे आणि इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page