
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली गावात अंडरपास ठेवण्यात आला आहे. महामार्गावरील दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड आहे. या सर्व्हिस रोडची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांना आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील सर्व्हिस रोडचे काम तातडीने करावे अशा मागणीचे निवेदन आरवली ग्रामस्थांनी दिले आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील आरवली अंडरपास दोन्ही सर्व्हिस रोडवरील नादुरुस्त आणि खडीयुक्त रस्ता दुचाकीस्वारांसाठी जीवघेणा ठरत आहे तर या ठिकाणच्या धुळीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. सध्या या ठिकाणी किरकोळ अपघात घडत असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरवली ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.