कोंबड्यांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या अडकला खुराड्यात; वनविभागाने केली बिबट्याची सुटका..

Spread the love

रत्नागिरी- कोंबड्यांची शिकार करण्यासाठी थेट खुराड्यात घुसलेल्या बिबट्याची खुराड्यातच अडकून पडल्याची घटना राजापूर तालुक्यातील करक तांबळवाडी येथे घडली आहे. खुराड्याच्या लोखंडी तारा कापून बिबट्याची सुखरूपपणे सुटका केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

खुराड्यामध्ये अडकलेला बिबट्या सुमारे एक ते दिड वर्षाचा मादी जातीचा असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे. करक येथे कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने सुटका केलेली असताना तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बिबट्याचा वावर आणि दहशत कायम राहिलेली आहे. त्यामध्ये गावपडवे येथील अनिल भोसले या शेतकर्‍याच्या सुमारे वीस-पंचवीस हजार रुपयांच्या बैलाला बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने त्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. याबाबत वनविभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार करक तांबळवाडी येथील आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम सुरु असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकल्याची माहिती करकचे पोलीस पाटील यांच्यामार्फत वनविभागाला मिळाली.

त्यानुसार रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार, वनरक्षक जालने, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे, निलेश म्हादये हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर खुराड्याच्या लोखंडी तारा कापून बिबट्याची सुखरूपपणे सुटका करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर, बिबट्याची राजापूरचे पशुधन विकास अधिकारी यांनी तपासणी केली असता बिबट्या सुस्थितीत असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम. गिरिजा देसाई, चिपळूणच्या सहाय्यक वनसंरक्षक प्रियांक लगड, रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुटका करण्यात आलेल्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page