• स्त्रीशक्ती सन्मान सोहळा,समाजभूषण पुरस्कार व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ होणार संपन्न
देवरुख:-गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचा लोकशाही मेळावा २४ डिसेंबर रोजी देवरुख येथे पार पडणार आहे.या मेळाव्याला गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे मार्गदर्शन करणार आहेत.यंदाचे मेळाव्याचे सहावे वर्षे आहे.
गाव विकास समितीच्या माध्यमातून दरवर्षी संविधानदिनानिमित्त लोकशाही मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते.यावर्षी हा मेळावा २४ डिसेंबर रोजी पार पडत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे लोकशाहीतील अधिकार समजावेत,लोकशाही मजबूत व्हावी व सर्व सामान्य नागरिकांनी लोकशाहीतील त्यांचे हक्कअधिकार समजून घेऊन आपला सर्वांगिण विकास साधून घ्यावा या हेतूने हा मेळावा आयोजित केला जात असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस डॉ मंगेश कांगणे यांनी दिली.मेळाव्याला गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,उपाध्यक्ष व कृषी तज्ज्ञ राहुल यादव,उपाध्यक्ष मंगेश धावडे,सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले,जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी समाजात उत्तम काम करणाऱ्या महिलांचा स्त्रीशक्ती सन्मान देऊन गौरव करण्यात येणार असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कांगणे यांनी दिली आहे.गाव विकास समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील यावेळी होणार असल्याचे डॉ मंगेश कांगणे यांनी सांगितले आहे.या मेळाव्याला लोकशाहीप्रेमी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन गाव विकास समितीने केले आहे.
जाहिरात