
मुंबई l 17 मार्च- मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात औरंगजेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मुघल शासक यांच्या विषयीच्या चर्चा आणि वाद सुरू आहेत. यातच रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. त्यामुळे या वादात आणखीनच भर पडली असताना आता या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही मागे नसल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे यांनी आता फोनवर हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा आणि मग पुढे बोलायला सुरुवात करा अशी सूचना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केली. त्यामुळे या चर्चेत तेही मागे नाहीत असे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, रोहित पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे ही संकल्पना जयंत पाटील यांची असल्याचे सांगायलाही शशिकांत शिंदे हे विसरले नाही.
शशिकांत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, आपला पक्ष छत्रपती शिवरायांच्या विचारांना माननारा पक्ष आहे. काही लोक शिवरायांना आपल्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विचारांचे खरे पाईक आपण आहोत. त्यामुळेच मी आपणाला आवाहन करतो की, यापुढे फोनवर संभाषणाची सुरुवात करताना जय शिवराय म्हणावे असे आवाहन करत सांगलीपासून सुरु झालेला उपक्रम राज्यभरात नेऊ असा निर्धारही यावेळी व्यक्त केला. दरम्यान जयंत पाटील यांनीही जय शिवराय असे लिहिलेले एक पोस्टर त्यांच्या एक्सवरील प्रोफाईलवर शेअर केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे सांगण्यासाठी हा निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.
भाजपाकडून करणाऱ्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीची वक्तव्ये ही विकृती करणारी असून त्यास विरोध आणि शिवरायांच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून देण्यासाठी जय शिवरायची संकल्पना मांडण्यात आली असल्याचेही अन्य एका राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले.