
रत्नागिरी (प्रतिनिधी): दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सान्निध्यात देश, धर्म आणि समाजासाठी रत्नागिरीत मंगळवार दि. १ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांचा नुकताच कोकण दौरा उत्साहात पार पडला.
रत्नागिरीच्या साळवी स्टॉप येथील स्टेट बँक कॉलनी जवळील नवीन ट्रक वाहन तळ मैदानावर हा आध्यात्मिक कार्यक्रम होत आहे. महासत्संग सोहळ्यानिमित्त याच मैदानावर १ एप्रिल रोजी सायंकाळी ४ते ५ या वेळेत विश्वशांतीसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सामूहिक पारायण आणि त्यानंतर कोकणच्या समृद्धीसाठी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनाची सेवा होईल.

या दोन्ही सेवा झाल्यानंतर समस्त सेवेकऱ्यांच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊलींचा अभिष्टचिंतन सोहळा देखील साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज होईल.
संपूर्ण कोकण आणि गोवा विभागातील सेवेकरी कार्यक्रमासाठी योगदान देत असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
कार्यक्रमाची माहिती देणारे फ्लेक्स मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा आणि कोकणातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उभारण्यात येत आहेत. कोकणातील हजारो सेवेकरी कार्यक्रमाचा जोरदार प्रचार-प्रसार करण्यात मग्न आहेत. घराघरात जाऊन प्रचार पत्रकांचे वाटपही सुरू आहे. तब्बल एका तपानंतर सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊली श्री. मोरे यांचे कोकणात आगमन होत असल्यामुळे सेवेकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

*गुरुपुत्र नितीनभाऊंचा कोकण दौरा..*
रत्नागिरीत १ एप्रिल रोजी होत असलेल्या महासत्संग सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुपुत्र श्री.नितीनभाऊ मोरे यांनी २३ मार्च रोजी कोकण दौरा केला. रत्नागिरी सेवाकेंद्रात कोकण आणि गोव्यातील सेवेकऱ्यांसमवेत त्यांनी आढावा बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले आणि त्यानंतर कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.
कोकण समितीने केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या समस्त सेवेकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.