
राजापूर (प्रतिनिधी): भाजपा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून त्यांची कामे करा, ती मार्गी लावा तरच पक्ष आणि पक्ष संघटना अधिक बळकट आणि भक्कम होईल आणि ग्रामपंचायत पासून खासदारकीपर्यंत आपली हक्काची सत्ता असेल हे लक्षात ठेवा असा कानमंत्र भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी राजापूरात भाजपा पदाधिकार व कार्यकर्त्याना दिला.
आता आपल्या हक्काचा खासदार म्हणून नारायण राणे हे आहेत, त्यामुळे विकासाची तुंम्ही चिंता करू नका ते आमच्यावर सोडा, मात्र गावागावात आणि वाडीवस्तीवर पक्ष संघटना, बुथ मजबुत करा असे आवाहन निलेश राणे यांनी यावेळी केले.
राजापूरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राजापूर तालुक्यातुन कमी मते मिळाली म्हणून नाराज होऊ नका, आंम्हीच कुठेतरी कमी पडलो असु असे सांगतानाच ती कसर भविष्यात भरून काढा असे आवाहन त्यांनी केले.
भविष्यात रोजगारासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प मार्गी लागला पाहिजे अशी मागणी करत खा. राणे यांच्या माध्यमातुन तो नक्कीच मार्गी लागेल असेही निलेश राणे यांनी यावेळी नमुद केले. तर राज्याच्या उद्योगमंत्र्यांनीही आता हा प्रकल्प राजापुरात व्हावा यासाठी राज्याच्यावतीने केंद्राला पत्र दयावे अशी मागणीही राणे यांनी केले.
मी तर आपल्या हक्काचाच माणूस आहे, कधीही साद घाला मात्र भविष्यात आपल्याला पक्ष सघटना अधिक बळकट करताना विकासाचा नवा अध्याय या भागात निर्माण करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि खा. नारायण राणे यांच्यासारखे जनतेचे सेवक म्हणून न थकता काम करा असे आवाहन निलेश राणे यांनी केले.