पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना – पर्यटन मंत्री गिरीश महाजन..

Spread the love

मुंबई: पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असलेले व्यवसाय असल्यास संबंधित उद्योजिका महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच, पर्यटन व्यवसायामध्ये ५०% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या आणि त्यांनी चालविलेल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसायाकरिता मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याज परतावा देण्यात येईल. या योजनेसाठी व्याजाची रक्कम १२% च्या मर्यादेत त्यांच्या खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधी पर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४.५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत असावे; या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत व्याजाचा परतावा म्हणून देण्यात येईल.

राज्यातील महिला पर्यटक उद्योजिकांनी अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर अथवा मुख्यालय – ०२२ ६९१०७६०० क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा पर्यटन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. कोकण ९१ ९६०४३ २८०००, पुणे ९१ ९४२३७ ७५५०४ नाशिक साठी ९१ ९६८९९०८१११ , छत्रपती संभाजी नगर ९१ ८९९९० ९७२५५, नागपूर आणि अमरावती ९१ ८४२२८ २२०५८ / +९१ ९२२६७७९७२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पर्यटन संचालनालय, पर्यटन विभाग, यांच्याकडून करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page