नवनीत राणांना लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार? पवारांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण…

Spread the love

शनिवारी उपमुख्‍यमंत्री अजित पवार एक दिवसीय अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवार याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. परंतु आजच्या भेटीने मात्र विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अमरावती- अमरावती दौऱ्यावर आलेले अजित पवार यांनी आज अपक्ष खासदार नवनीत राणा यांची भेट घेतल्यानं, राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलं आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या अमरावती लोकसभेच्या खासदार राणा यांनी पुढे भाजपा सोबत जाऊन कमळाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. खासदार नवनीत राणा या अपक्ष असून त्यांनी भाजपाला समर्थन दिलं आहे.

सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट….

उपमुख्यमंत्री अजित पवार हे ९ डिसेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर होते. नवनीत राणा यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. खासदार नवनीत राणा या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याने, सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लावण्यात येत आहे. 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका तोंडावर असताना नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय.

राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग…

खासदार नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीला स्थानिक पातळीवरून जोरदार विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग तर लावत नाही ना असा अंदाज, मतदारांनी लावला आहे. नवनीत राणा पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं राजकीय क्षेत्रातून अंदाज वर्तवण्यात येत आहे. या भेटीत नेमकी काय आणि कुठल्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे….

भेटीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या की, सध्याचे जे सरकार आहे त्या सरकारमध्ये युवा स्वाभिमान पक्ष हे इंडियाचा एक घटक आहे. मी जिल्ह्याची खासदार आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री पवार आपल्या शहरात आल्यामुळं त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी मला नेहमीच समर्थन दिलं आहे, त्यांची मी कायमच ऋणी आहे. येणारी लोकसभा निवडणूक आपण राष्ट्रवादीच्या पाठिंबांने लढणार का? या प्रश्नावर उत्तर देताना खासदार राणा म्हणाल्या की, मी सध्या एनडीएचा घटक आहे, परंतु भविष्यात जनतेची इच्छा राहिली तर बघू.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती निवडणूक…

या भेटी दरम्यान नेमकी काय किंवा कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही. परंतु होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी पाठिंबा द्यावा, यासाठी नवनीत राणा यांनी भेट घेतल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नवनीत राणा यांना २०१९ लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता, तर २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी त्या पराभूत झाल्या होत्या, तर २०१९ मध्ये विजयी झाल्यानंतर नवनीत राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा यांनी कायम भाजपच्या पाठीशी उभे राहणं पसंत केलं. तेव्हापासून नवनीत राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संबंध ताणले गेले होते.

निवडणुकीमध्ये कोणाकडे मागणार पाठिंबा…

या भेटीवर नवनीत राणा यांनी स्पष्ट तरीही जपून वक्तव्य केलं आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, अमरावतीमध्ये आले आहेत, शिवाय ते एनडीएचे घटक आहेत. त्यामुळं भेट घेतली, असं त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार का, यावर त्यांनी कोणतेही स्पष्ट विधान केलं नाही. नवनीत राणा या अमरावतीच्या अपक्ष खासदार असून, त्यांनी कायम भाजपाच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. हनुमान चालीसा प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड करणाऱ्या राणा यांनी भारतीय जनता पक्षाच्या गटातच राहणं पसंत केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या भाजपाकडे उमेदवारी मागणार की, पुन्हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे किंवा शरद पवार गटाकडे पाठिंबा मागणार हे पाहण औसुक्याचे ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page