नवरात्रों उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या, प्रेरणादायी, नेतृत्ववान, कर्तृत्वान, गुणांकडे झेप घेणाऱ्या महिला!
कणखर व खंबीरपणे एसटी कंडक्टर काम करतात …..भक्ती नागवेकर!
निसर्गाने निर्माण केलेला सर्वोत्तम नमुना म्हणजे स्त्री आणि पुरुष! हे दोन केवळ भिन्न देहच नव्हे,तर संपूर्णतः भिन्न प्रकृती आहेत. स्त्री कोमल तर पुरुष दणकट! परंतु स्त्रीच्या मनात जर आत्मविश्वास निर्माण झाला तर स्त्री खंबीर पणे उभी राहते. स्त्री प्रसंगी मेणाहून मऊ,तर वज्राहून कठोर होऊ शकते. ती मनाने कोमल असली तरी विचाराने कणखर असते. स्त्रीमध्ये उपजत शक्तीचा वास असतो. अशाच नवरात्रीतील नवदुर्गा रूप म्हणून भक्ती नागवेकर कंडक्टर म्हणून आपले काम कणखरपणे पार पाडतात!
वृषाली दिलीप मयेकर उर्फ भक्ति महेश नागवेकर यांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला असून माहेर संगमेश्वर तालुक्यातील वांद्री गाव आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत वांद्री येथे व बारावीपर्यंत कोळंबे अशा ग्रामीण भागात झाले. वडिलांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने आई वडील यांना शेती करणे हाच पर्याय होता. दोन्ही भावांचेही त्या परिस्थितीत शिक्षण चालू असल्याने बारावीनंतर आयटीआय मध्ये ड्रेस मेकिंग साठी प्रवेश घेऊन एक वर्ष कोर्स केला. त्यामुळे घरी थोडेफार शिलाई काम करू लागल्या. असे काही दिवस सरत असतांना लग्नाचे वय झाल्याने कोंड आंबेड येथील महेश नागवेकर यांच्याशीही
२००६ साली विवाह झाला. महेश पती यांचा मालवाहतूक टेम्पोचा व्यवसाय चालू होता. पण तरीसुद्धा मला सासरी केवळ घर काम करून शांत बसणे योग्य वाटत नव्हते.
त्या वेळी सासरे यांनी आपली जमीन कोकण रेल्वे मध्ये गेल्याने प्रकल्पग्रस्त म्हणून काहीतरी नोकरी मिळेल अशी प्रेरणा देऊन या हेतूने सासरच्यांनी भक्तीकडून mscit करून घेतले.
परंतु सासऱ्यांचे निधन झाल्याने ते शक्य झाले नाही. संगमेश्वर येथे रविराज टेलर येथे टेलरिंग सरावासाठी जात होते. व सासरी आंबेड येथे घरी शिलाई काम करू लागले. याच दरम्यान धाकटा भाऊ मंदार मयेकर व मोठे दिर राजेश नागवेकर यांनी एसटी कंडक्टर बॅच काढण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे बॅच काढला. तेव्हा दुर्मिळ स्त्रिया कंडक्टरचे काम करताना दिसत होत्या. म्हणजे कधीतरी स्त्रीला कंडक्टर म्हणून पाहिलेले आहे.
असा मनात विचार वाटायचा, की, मला एसटी कंडक्टर काम नक्की करता येइल, कारण एरवी प्रवास करताना खूप गर्दीतून उभ्याने प्रवास करून तोळ सांभाळता येत होता. म्हणजे इतर स्त्री कंडक्टर प्रमाणे गर्दीत करू शकते हा आत्मविश्वास वाढला.
२०११ साली बॅच काढल्यानंतर एका वर्षानंतर कंडक्टर भरतीची जाहिरात निघाली.व प्रोसेस प्रमाणे ऑनलाइन अर्ज केला. त्यानंतर काही महिन्यांनी परीक्षा रत्नागिरी विभाग कार्यालयात घेण्यात आली. त्या मध्ये२५% मराठी व्याकरण,२५% इंग्रजी व्याकरण, २५%:गणित व २५% सामान्य ज्ञान, अशा निकषावर आधारीत झालेल्या परीक्षेत भक्ती पास झाल्या.त्यानंतर टेलरिंग चालू असताना काही दिवसांनी २ मे २०१३ रोजी कंडक्टरसाठी काॅल आला.व रत्नागिरी येथे आवश्यक कागदपत्रांची छाननी करण्यात आली. व त्यानंतर आठ दिवस रत्नागिरी विभाग कार्यालयात प्रशिक्षण झाले. व आठ दिवस एसटी बस मध्ये कंडक्टर सोबत प्रशिक्षण घेतले. व देवरुख डेपोत कंडक्टर पदावर हजर होण्याचे पत्र मिळाले.
९ जून २०१३ रोजी देवरुख डेपोत हजर झाले. व अद्यापही देवरुख डेपोत कार्यरत आहे. आत्ता वाहतूक नियंत्रक पदाची परीक्षा दिलेली असून ही परीक्षा पास झाल्या आहेत. सीनियरटी प्रमाणे प्राधान्याने आदेश मिळेल, व त्याप्रमाणे वाहतूक नियंत्रक काम करण्यासाठी आता आत्मविश्वास वाढला आहे.
ड्युटीवर असताना प्रवाशांचे सहकारी उत्तम मिळत असून आपल्याकडून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात. त्यामुळे बऱ्यापैकी प्रवासी ओळखतात. ड्युटी वेळी प्रवाशांकडून किंवा आपल्याकडून गर्दीच्या वेळी आक्रमकता प्रसंग येत नाही. शालेय विद्यार्थ्यांना गर्दी असली तरीही घेऊन पुढे जातात. बुरंबी हायस्कूलमध्ये मुलांची गर्दी खूप असते. त्यावेळी दोन ,दोन लाईन करून विद्यार्थ्यांना गाडीत घेऊन वेळेत पोहोचतील ही काळजी घेतली जाते.
कंडक्टर सर्व ड्युटी कामात आपण समाधानी असून यासाठी पती महेश नागवेकर यांचा पाठिंबा व भक्कम आधार उपयोगी पडतो.त्यामुळे गौरी गणपती सणांच्या हंगामात प्रसंगी रात्री ही ड्युटी करण्यासाठी पती सहकार्य करतात. त्यामुळे रात्रीही ड्युटी केलेली आहे.
यामुळे इतर महिला भगिनींना सांगू शकते की कोणतेही काम कराच, यासाठी आत्मविश्वास वाढवा .व मनाची तयारी करा.
स्त्री कुठे कमी पडू शकत नाही अशी खात्री देतात. यासाठी एसटी अधिकारी सोबत ड्युटीवर असणारे चालक बांधव पूर्णपणे भावंडांप्रमाणे सहकार्य करतात. कोणत्याही क्षेत्रात स्त्री नक्कीच भरारी घेईल, फक्त त्यासाठी मानसिकता व ठाम विश्वास हवा!.
लेख शब्दांकन. ….
श्रीकृष्ण खातू/ धामणी /संगमेश्वर – मोबा.नं. – ८४१२००८९०९