
आयुष्याचा शेवट करण्यापूर्वी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबूकवर साडे नऊ तासात तब्बल सहा वेगवेगळ्या पोस्ट केल्या. या पोस्टमधून मुंडेंची त्यांच्या मनात किती दहशत होती, हे स्पष्ट होतंय.
बीड: बीड शहरातील स्वराज्य नगर भागात गुरुवारी 14 मार्चला एका शिक्षकानं गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. बीड शहरातील कृष्णा अर्बन बॅकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबूकवर साडे नऊ तासात तब्बल सहा वेगवेगळ्या पोस्ट केल्या. रात्री पावणे दहा वाजता शेवटची फेसबूक पोस्ट लिहून त्यांनी आत्महत्या केली. या पोस्टमध्ये शाळेचे संचालक मुंडे यांच्यावर विविध गंभीर आरोप केले.
नागरगोजे यांनी 14 तारखेला दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी पहिली पोस्ट केली होती. यानंतर पुढच्या साडेनऊ तासांत त्यांनी फेसबूकवर एकूण सहा पोस्ट केल्या. या पोस्टमधून त्यांच्या मनात मुंडेंबाबत किती दहशत होती, हे दिसून येतंय. त्यांनी एका पोस्टमध्ये मुंडे मला हालहाल करून मारतील, त्यांच्या हातून मरण्यापेक्षा स्वत: मेलेलं बरं, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या तीन मुंडेंचा देखील पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.
माझ्या मृत्यूला फक्त आणि फक्त विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे आणि अतुल विक्रम मुंडे हेच जबाबदार असतील. या व्यक्तींना जर आवर घातली नाही, तर माझ्याजवळ आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यांनी मला गाठलं, तर हे माझे हाल हाल करून, मला मारतील, अशी भीतीही नागरगोजे यांनी एका पोस्टमध्ये व्यक्त केली आहे. आत्महत्या करण्याआधी नागरगोजे किती दडपणाखाली होते, हेच यातून दिसून येत आहे.
आपण मेल्यावर न्याय मिळेल की नाही, हे कोणी पाहिलं आहे. यांच्या हातून हाल हाल होऊन मरण्यापेक्षा स्वतः मेलेलं बरं… या मोठ्या लोकांच्या हाता खाली नोकरी करण्याची एवढी मोठी सजा मिळेल, काय माहीत… मला माफ करा असंही नागरगोजे यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. 14 तारखेला रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी नागरगोजे यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला उद्देशून शेवटची भावनिक पोस्ट लिहिली. या पोस्टनंतर काही वेळात त्यांनी मृत्यूला कवठाळलं.
अखेरच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलं?
श्रावणी बाळा तुझ्या बापुला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. मी कधी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच, तर तुझ्या बापूला एकदा माफ कर. कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे. तुला अजून काहीच कळत नाही, तुझं वय आहेच किती… तीन वर्षे… तुला काय कळणार…. ज्यांना कळायला पाहिजे होतं, त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.