
WPL 2025 च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा विजेता बनला आहे.
मुंबई WPL Final : WPL 2025 च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यात यश मिळविलं. मुंबई इंडियन्सनं अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्स WPL मध्ये सर्वाधिक 2 विजेतेपद जिंकणारा संघ बनला आहे.
मुंबईचा विजय : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघानं 20 षटकांत 7 गडी गमावून 149 धावा केल्या. संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं वादळी अर्धशतक झळकावलं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अष्टपैलू नॅट सिव्हर-ब्रंट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हरमनप्रीतनं 66 धावांची शानदार खेळी खेळली तर नेट सिव्हर-ब्रंटनं फलंदाजी करत 30 धावा केल्या आणि गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्या. तर अमेलिया केरनंही 2 विकेट घेतल्या.
मुंबईकडे चषकांचा अंबार : मुंबई इंडियन्स 2023 मध्ये पहिल्यांदाच WPL चॅम्पियन बनला. तर, गेल्या वर्षी आरसीबीने जेतेपदावर कब्जा केला होता. मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन बनल्यामुळं, MI च्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये आणखी एक मोठं विजेतेपद जोडलं गेलं आहे. आता MI च्या खात्यात 12वी ट्रॉफी जमा झाली आहे.
जगभरातील लीगमध्ये संघ : खरं तर, MI फ्रँचायझी संघ आता जगभरातील लीगमध्ये भाग घेतो. अशा प्रकारे, अवघ्या काही वर्षांत, MI जगातील सर्वात यशस्वी T20 फ्रँचायझी बनली आहे. 5 वेळा IPL जिंकण्याव्यतिरिक्त, MI नं चॅम्पियन्स लीग T20 चं विजेतेपद दोनदा जिंकलं आहे आणि आता 3 वर्षात 2 वेळा WPL जिंकलं आहे. याशिवाय, एमआय न्यूयॉर्क अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये म्हणजे एमएलसीमध्ये एकदा चॅम्पियन बनला आहे. MI फ्रँचायझी संघांनं ILT20 आणि SA20 मध्ये प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावलं आहे. अशा प्रकारे, MI च्या कॅबिनेटमध्ये आता एकूण 12 ट्रॉफी आहेत.
मुंबई इंडियन्सनं जिंकली WPL 2025 ट्रॉफी…
आयपीएल- 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 (मुंबई इंडियन्स)
CLT20- 2011, 2013
MLC – 2023 (MI न्यूयॉर्क)
ILT20 – 2024 (MI Emirates)
SA20 – 2025 (MI केप टाउन)
WPL – 2023 आणि 2025 (मुंबई इंडियन्स महिला)