
बीड जिल्हा पुन्हा एका खुनाच्या घटनेनं हादरला आहे. आष्टी इथं एका २५ वर्षीय तरुणाला हालहाल…
बीड: मागील काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या विविध घटना समोर येत आहेत. अमानुषतेचा कळस गाठून हत्या आणि मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडीओज समोर आले आहेत. एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत असताना, बीड जिल्ह्यात गुन्ह्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. संतोष देशमुखांनंतर सुरेश धस यांचे कार्यकर्ते सतीश उर्फ खोके भोसले याने एकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हे प्रकरण ताजं असताना आता बीड जिल्हा पुन्हा एका खुनाच्या घटनेनं हादरला आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी इथं एका २५ वर्षीय तरुणाला हालहाल करून मारलं आहे. मयत तरुण ज्या व्यक्तीकडे कामाला होता, त्याच व्यक्तीने तरुणाला दोन दिवस घरात डांबून ठेवत त्याला अमानुष मारहाण केली. याच मारहाणीत तरुणाचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
विकास बनसोडे असं मयत तरुणाचं नाव आहे. तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता. क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध सुरू असल्याच्या संशयातून मुलीच्या घरच्यांनी तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती, की यात युवकाचा जागीच मृत्यू झाला.
मयताच्या पाठीवर मारहाणीचे व्रण आहेत. मारहाण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे. डांबून मारहाण करत जीव घेतल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. बीडमध्ये मारहाण आणि हत्येच्या विविध घटना समोर येत असताना या नव्या घटनेनं यात आणखी भर घातली आहे. त्यामुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे.