मुंबई- वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिवाळीच्या सुट्टीमुळे गाड्यांना मोठी गर्दी आहे. गोरखपूर एक्सप्रेसमधून जाण्यासाठी बांद्रा स्टेशनवर जमलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि यानंतर चेंगराचेंगरी झाली.
शब्बीर अब्दुल रहमान (40), परमेश्वर सुखदार गुप्ता (28), रवींद्र हरिहर चुमा (30), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कांगे (27) अशी जखमींची नावे आहेत. दिव्यांशु योगेंद्र (18), मोहम्मद शरीफ शेख (25), इंद्रजीत साहनी (19) आणि नूर मोहम्मद शेख (18),अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रेल्वे मंत्री महाशय बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये- राऊत..
संजय राऊत म्हणाले की, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुविधांबाबत कुणीही चर्चा करायला तयार नाहीत. येथील समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. रेल्वे मंत्री महाशय बुलेट ट्रेनच्या मस्तीमध्ये आहेत आणि आमचे प्रवासी चेंगरुन मरत आहेत. देशात 17 मोठ्या अपघातांसह इतरही छोटे मोठे अपघात झालेत. त्यात अनेक लोकांचे मृत्यू झाले. नितीन गडकरी हवेत बस उडवण्याची चर्चा करतात, पण जमिनीवर काय घडत आहेत.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट..
आपल्या रीलमंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवे. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणे, हे लज्जास्पद..