
पुणे- भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला असून मालिकाही गमवावी लागली आहे. तब्बल १२ वर्षांनी भारताला मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली आहे.
भारताला कसोटी सामना जिंकण्यासाठी ३५९ धावांचे आव्हान दिले होते. पण यशस्वी जयस्वाल वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच त्यांना सामना गमवावा लागला. भारताने पहिला कसोटी सामना बंगळुरु येथे गमावला होता. त्यानंतर भारतावर पुण्यातील सामना गमावण्याची वेळ आली. भारताला दुसऱ्या डावात २४५ धावा करता आल्या आणि त्यांच्यावर ११३ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आता न्यूझीलंडच्या संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघापुढे न्यूझीलंडला सर्व बाद करण्याचे आव्हान होते. ते आव्हान भारतीय संघाने पेलले. भारताच्या फिरकीपटूंनी यावेळी तिसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारताला न्यूझीलंडला दुसरा डाव २५५ धावांवर आटोपता आला. त्यामुळे भारतापुढे विजयासाठी ३५९ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारतीय संघाला हे आव्हान पूर्ण करत मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती. भारताला पुन्हा एकदा रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला. रोहित शर्मा यावेळी ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही काळ यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांची चांगलीच जोडी जमली होती. पण त्यानंतर गिल बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. पण यशस्वी जयस्वाल मात्र नेटाने खेळत राहीला.
यशस्वीने यावेळी अर्धशतक झळकावले आणि त्याने भारताच्या विजयाची आशा निर्माण केली होती. पण यशस्वीला यावेळी दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. विराट कोहली यावर १७ धावांवर बाद झाला, ऋषभ पंतला तर यावेळी भोपळाही फोडता आला नाही. यशस्वी शतकाच्या दिशेने कूच करत होता, पण त्याला शतक पूर्ण करता आले नाही. यशस्वीने ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७७ धावांची खेळी साकारली. यशस्वी जयस्वाल बाद झाला आणि त्यांनतर भारताच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. रवींद्र जडेजाने यावेळी चांगली लढत दिली खरी, पण त्याला सामनाही काही वाचवता आला नाही. त्यामुळे भारताला हा सामना ११३ धावांनी गमवावा लागला. भारताला न्यूझीलंडकडून पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे रोहित शर्मावर ही नामुष्कीची वेळ आली आहे.