खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध; सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; लोकसभेचा मार्ग मोकळा…

Spread the love

नवीदिल्ली- अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निकाल देताना नवनीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.

नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. अशातच त्यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने 2021 मधे अवैध ठरवलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला होता. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निकाल दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालामध्ये नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करोल यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आज अमरावतीमध्ये नवनीत राणा या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून अमरावतीत भाजपचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज अमरावतीमधील भाजपच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page