दिड वर्षाच्या मुलासमोर आईने गळफास घेऊन संपवले जीवन; चिपळूणमधील हृदयद्रावक घटना…

Spread the love

चिपळूण- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात एका २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या दीड वर्षांच्या मुलासमोर आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी चिपळूणमधील पाग परिसरात घडली. कोमल सचिन दिलवाले (२६) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पाग येथील एका अपार्टमेंटमध्ये कोमल ही नवरा, दीड वर्षांचा मुलगा, सासू-सासरे यांच्या समवेत रहात होती. गुरुवारी सकाळी ती आणि मुलगा हे दोघेच घरी होते. तर इतर कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोमलचे सासरे घरी परतले. त्यावेळी त्यांना नातवाच्या रडण्याचा आवाज आला. कोमलला हाक मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती. तर नातू जोरजोरात रडत असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि समोरील दृश्य पाहून ते हादरले.

कोमलने गळफास घेतला होता तर तिला त्या अवस्थेत पाहून लहानगा नातू रडत होता. त्यांनी तातडीने मुलाला फोन करून बोलावून घेतले. यानंतर कोमलला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले. कोमलने उच्च शिक्षण घेतले होते. तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page