पुणे : पोषक वातावरण आणि अनुकूल स्थितीमुळे मान्सूनने गोव्यापर्यंत मुसंडी मारली आहे, परंतु गेल्या दोन दिवसांपासून मान्सून गोव्यातच थांबलेला आहे. मात्र, येत्या २४ ते ४८ तासांत मान्सून कोकणासह मुंबई, पुणे आणि दक्षिण महाराष्ट्रात पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सून दोन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला असून त्याने जोरदार हजेरी लावलेली आहे. लगेच मान्सून कोकणापर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र, पोषक स्थिती नसल्यामुळे मान्सूनचा मुक्काम गोव्यातच थांबला आहे. त्यामुळे कोकण प्रवेश रखडलेला आहे. दरम्यान, २४ ते ४८ तासांत कोकणासह मुंबई, पुणे, दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. याबरोबरच मान्सून येत्या तीन दिवसांत मध्य अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भाग तसेच ईशान्य भागात दाखल होणार आहे.