मान्सून मंगळवारी कोकणात दाखल होणार…

Spread the love

मुंबई- मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झाला. ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहचल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांना मान्सूनचे वेध लागले आहे. मान्सून आनंदवार्ताच घेऊन आला आहे. मान्सूनची महाराष्ट्राकडे दमदार वाटचाल सुरु आहे. त्यामुळे मंगळवारी ४ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानंतर ६ जून रोजी पुण्यात मान्सून पोहचणार आहे.

केरळमध्ये मान्सून आल्यानंतर आधी कोकणात येतो. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजेच आठ ते दहा तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रेमल या चक्रीवादळामुळे मान्सून बंगालच्या उपसागरात सक्रीय झाला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल दमदार सुरु आहे. मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा अधिक मजूबत होणार आहे. पुणे हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्र डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे की, जून महिना सुरु झाल्यामुळे या महिन्यात जो पाऊस पडेल तो मान्सूनचा समजला जाईल.

सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात ३ जून रोजी, तळ कोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून दाखल होण्याच्या बातमीमुळे कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सलग चार दिवसांपासून विदर्भात तापमान ४५ अंशांवर आहे. शुक्रवारी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर तापमान काहीसे कमी झाले. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2 जूनपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page