श्रीनगर- राज्यात अलीकडेच झालेले दहशतवादी हल्ले केंद्राने गांभीर्याने घेतले आहेत. जम्मू-काश्मीरच्या परकीय शत्रूंना शिक्षा करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, शत्रूंना चोख उत्तर दिले जाईल, असा कडक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मोदी गुरुवारी दोन दिवसांच्या श्रीनगर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी येथे १५०० कोटी रुपयांचा ८४ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर २००० तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तिपत्रे दिली.
काश्मिरात योगासनांचा सर्वात मोठा कार्यक्रम
पंतप्रधान मोदी शुक्रवारी श्रीनगरमध्ये जागतिक योग दिन साजरा करणार आहेत. या वेळी ते दल सरोवराच्या काठावर सुमारे ७००० काश्मिरी लोकांसोबत योगा करणार आहेत. काश्मीरमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा योगा कार्यक्रम असेल. संपूर्ण परिसर ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक निगराणीखाली ठेवण्यात आला आहे.