आमदार शेखर निकम यांची देवरुखमधील पर्यटन व नैसर्गिक शेती विकास आराखडासंदर्भात आयोजित चर्चासत्रात ग्वाही
चिपळूण- संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. या ठिकाणी मार्लेश्वर, टिकलेश्वर सारखी प्रसिध्द तिर्थक्षेत्रे, तर प्रचितगड, महिपतगड, भवानगड सारखे ऐतिहासिक महत्व असलेले गड आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित येऊन पर्यटनाचा आराखडा करुन शासनाला सादर करावा जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील असून तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी देवरुख येथे काल शुक्रवारी बोलताना केले आहे.
देवरुख पंचायत समितीमधील सभागृहात पर्यटन व नैसर्गिक शेती विकास आराखडासंदर्भात शुक्रवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शेखर निकम बोलत होते. संगमेश्वर तालुक्यात पर्यटन वाढीच्या खूप संधी आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. या आराखड्याचे हेमंत तांबे यांनी सादरीकरण केले. या वेळी तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकास करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. रत्नसिंधुच्या माध्यमातून हाऊसबोट मंजूर करण्यात येईल, सप्तलिंगी नदीवर जलसंधारण अंतर्गत बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील. सप्तलिंगी नदीच्या उगमापासून शेवटपर्यंत अठरा गाव येतात. या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी जलपर्यटन, जंगल पर्यटन करणे शक्य आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी सप्तलिंग परिषद घेणे आवश्यक असल्याने निखील कोळवणकर यांनी सांगितले.
पर्यटनात वाढ होण्यासाठी साहसी क्रीडा प्रकार सुरु करावे. भवानगड, राजवाडी येथील गडावर ट्रेकिंगची सुविधा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पठारवाडी येथील जागेवर जैव विविधता उद्यान सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार निकम यांनी सांगितले.
यावेळी पर्यटनाबरोबर नैसर्गिक शेतीवरही चर्चा करण्यात आली. कृषि विभागामार्फत दिली जाणारी कलमे ही निकृष्ट दर्जाची असतात. त्यामुळे ही कलमे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला प्रतिकलम ६० रु. चा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे चांगल्या पध्दतीची कलमे शेतकऱ्यांना उपलब्ध करन द्यावी, अशी मागणी तांबे यांनी या वेळी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कंपनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या चर्चासत्राला उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पर्यटन अधिकारी शुभांगी साठे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय कृषि अधिकारी शिवाजी शिंदे, प्रांत जीवन देसाई, परीविक्षाधिन अधिकारी विश्वजित गाताडे, तहसिलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चौगले, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे, सातारा नगर पालिकेचे उपाध्यक्ष सुहास आबासाहेब राजेशिर्के, देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, देवरुख न. पं. चे मुख्याधिकारी चेतन विसपुते, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार, प्रमोद अधटराव, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, मंगेश बांडागळे, प्रफुल्ल बाईत आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी केले.