देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर लवकरच होण्याचे संकेत… आमदार शेखर निकम यांनी आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांची घेतली भेट…

Spread the love

देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे 30 खाटांवरून 50 खाटांच्या सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब यांची सकारात्मक चर्चा केली.

देवरुख रुग्णालय हे नगर पंचायत क्षेत्रात असून, मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे वाढती लोकसंख्या आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव पाहता, रुग्णांना रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई किंवा मिरज येथे हलवावे लागते. यामुळे रुग्णांच्या वेळेची आणि आर्थिक हानी होत आहे. मुंबई-गोवा व कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील अपघातांमध्ये गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा स्थितीत देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणे अत्यावश्यक आहे. सदर प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर असून, आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रस्तावाबाबत सकारात्मक चर्चा केली आहे.

या रूपांतरामुळे स्थानिक जनतेला आणि अपघातग्रस्तांना तत्काळ, दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, आवश्यक डॉक्टर रिक्त पदे तसेच इतर कर्मचारी वर्ग याचे भरतीसंदर्भात व आरोग्यविषयक सोई सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली. इतर रुग्णालयाविषयक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून लवकरच देवरुख रुग्णालय सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय म्हणून कार्यरत होईल. हे पाऊल संगमेश्वर तालुक्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देवरुख व आसपासच्या भागातील नागरिकांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळतील, तर रुग्णांची आर्थिक बचत होऊन गंभीर परिस्थिती टाळता येईल. आमदार शेखर निकम यांचा हा निर्णय आरोग्यसेवेत नव्या युगाची सुरुवात ठरेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page