“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य…

Spread the love

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबई /प्रतिनिधी- संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.बीडच्या केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ३६ दिवस उलटले आहेत. तरी अद्याप या हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तसेच देशमुख कुटुंबासह मस्साजोगचे ग्रामस्थ व विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडकडे बोट दाखवलं आहे. मात्र, वाल्मिकवर कठोर कारवाई झालेली नाही. वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधी व सत्ताधारी पक्षांमधील नेते, आमदार वाल्मिक कराडवर कारवाई व्हावी, त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करत आहेत. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्या जात आहेत. वाल्मिक कराडचे गुंड धनंजय देशमुख यांना धमक्या देत आहेत. तर, भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. परंतु, त्यांना ही लढाई लढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे संतापलेल्या धनंजय देशमुख यांनी सोमवारी (१३ जानेवारी) तीव्र आंदोलन केलं.

धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. तसेच, मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी ते टॉवरवर चढले. तर, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी देखील गावात तीव्र आंदोलन केलं. धनंजय देशमुखांनी आत्महत्या करू नये यासाठी प्रशासन व अनेक नेत्यांनी त्यांना विनवण्या केल्या. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय देशमुखांना विनंती केली. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा, त्याच्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सर्व ताकद लावण्याचा शब्द दिल्यावर आणि मनोज जरांगे पाटील यांनी न्यायासाठी व्यवस्था उलथून टाकण्याचा शब्द दिल्यावर धनंजय देशमुख यांनी त्यांचं आंदोलन थांबवलं आणि ते टॉवरवरून खाली उतरले. मात्र, ३६ दिवसांनंतरही कोणत्याही आरोपीला कठोर शासन झालेलं नसल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?…

दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते हसन मुश्रीफ यांनी यावर भाष्य केलं आहे. मुश्रीफ यांनी सोमवारी संध्याकाळी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी धनंजय देशमुख यांच्या आंदोलनासंदर्भात माहिती घेतलेली नाही, त्यामुळे मला त्यावर काही वक्तव्य करता येणार नाही. परंतु, संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने सांगितलं आहे की या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना आम्ही कडक शासन करू. माझ्या माहितीप्रमाणे या हत्या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. केवळ एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याला देखील लवकरच पकडतील. तसेच या प्रकरणातील आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई होणार आहे. या प्रकरणासंदर्भातील सगळी कायदेशीर कारवाई करत असताना त्यांची (पीडित, ग्रामस्त व विरोधक) जी धनंजय मुंडेंसंदर्भातील मागणी आहे, त्या मागणीला कुठलाही मोठा आधार अथवा पुरावा नाही. पुरावा असेल तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. मला वाटतं की सध्या विश्वासाने वातावरण शांत ठेवण्याची आवश्यकता आहे”.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page