यवतमाळमध्ये बचत गटांचा मेळावा:9 कोटी शेतकऱ्यांना 21000 कोटी सन्मान निधी देऊन मोदींनी मागितली 400 खासदारांची गॅरंटी…

Spread the love

यवतमाळ- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी यवतमाळमध्ये बचत गटांच्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन केले. आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना मोदी म्हणाले, ‘स्वातंत्र्यापासून २०१४ पर्यंत देशात हाहाकार होता. या पक्षाने आदिवासी, मागासवर्गीयांना विकासापासून वंचित ठेवले.

काँग्रेसचे सरकार होते तेव्हा दिल्लीतून १ रुपया निघाला तर १५ पैसे जनतेपर्यंत पोहोचायचे. आज मी एक बटण दाबले आणि ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २१ हजार कोटी रुपयांचा हप्ता जमा झाला. काँग्रेस असती तर यापैकी १८ हजार कोटी मध्येच लुटले गेले असते. भाजपच्या काळात गरिबांना पैसा मिळतोय ही मोदींची गॅरंटी आहे. २०१४ मध्ये तुम्ही मला ३०० जागा दिल्या, २०१९ मध्ये ३५० दिल्या. आता ४०० जागा देणार आहात,’ असे आवाहन मोदींनी देशातील जनतेला केले.

🔹️मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावण्यास मोदी कटिबद्ध…

शरद पवारांचे नाव न घेता मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्राचे नेते कृषिमंत्री असताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर दिल्लीतून पॅकेज जाहीर व्हायचे, पण हा पैसा मध्येच लुटला जायचा. आदिवासी व शेतकऱ्यांना काहीच मिळत नव्हते. आम्ही २३ हजार कोटींची ‘पीएम जनमन’ योजना आणली. ती मागासवर्गीय जनतेला चांगले जीवन देईल.’

▪️मराठवाडा-विदर्भासाठी सिंचन प्रकल्प, रेल्वेचा विस्तार

▪️कृषी सिंचन योजना : मराठवाडा, विदर्भातील १६८३ कोटींच्या ६ सिंचन प्रकल्पांचे माेदींच्या हस्ते लोकार्पण.

▪️बळीराजा जलसंजीवनी योजना : विदर्भ, मराठवाड्यातील ११८० कोटींच्या ४५ प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.

▪️रेल्वेचे जाळे : बीड जिल्ह्यातील न्यू आष्टी- अंमळनेर ३२.८४ किमी मार्गाचे लोकार्पण. प्रकल्पाचा खर्च ६४५ कोटी.

▪️रेल्वेमार्ग : वर्धा- कळंब ३९ किमी मार्गाचे लोकार्पण करून नवीन रेल्वेचा शुभारंभ (प्रकल्प खर्च : ६७५ कोटी)

🔹️महिला सशक्तीकरण : ५.५ लाख बचत गटांना ८२५ कोटी फिरता निधी दिला…

ओबीसींसाठी मोदी आवास : २.५ लाख लाभार्थींना ३७५ कोटींचा पहिला हप्ता वाटप. आयुष्मान भारत योजनेच्या १ कोटी लाभार्थींना कार्डचे वितरण.

🔹️खुर्च्यांवर स्टिकर्स राहुल गांधींचे…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची २८ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात सभा झाली होती. त्या वेळी सभेतील खुर्च्यांच्या पाठीमागे राहुल गांधी यांचा फोटो असलेले स्टिकर व पक्षनिधी गोळा करण्यासाठी काँग्रेसने क्यूआर कोड लावला होता. योगायोगाने बुधवारी मोदींच्या सभेच्या तयारीचे काम त्याच ठेकेदाराला देण्यात आले होते. त्याने आणलेल्या काही खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर तसेच होते. ही बातमी व्हायरल झाली. त्यानंतर मात्र धावपळ करत ठेकेदाराने स्टिकर्स काढले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो लावून जनतेने योग्य तो संदेश दिलाय.’

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page